breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“दगडूशेठ पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर…” : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी खास या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले असले तरी त्यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. तिथे अभिषेकही केला. तसेच पुरस्कार प्रदान केल्यानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आणि दगडूशेठ यांचा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात एखादं भाषण करतात, तेव्हा त्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतात. आजही त्यांनी मराठीतून भाषणाची सुरुवात केली. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आज लोकशाहीर आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्याने त्यांनाही पंतप्रधानांनी अभिवादन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी इथे येण्याआधी पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन गणपतीचे आशीर्वाद घेतले. हे मंदिर पुणे जिल्ह्याच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. दगडूशेठ हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग नोंदवला आणि सार्वजनिकरित्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मी या पावन भूमीला आणि या भूमीत जन्माला आलेल्या विभूतींना नमन करतो.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं महत्त्व काय?
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे १८ व्या शतकातले पुण्यातले सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातल्या बुधवार पेठ भागात असलेलं दत्त मंदिर भागात त्यांचं वास्तव्य होतं. प्लेगच्या साथीत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं. या घटनेमुळे दगडूशेठ हलवाई आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दोघेही दुःखी झाले. त्यावेळी माधवनाथ नावाचे महाराज होते त्यांनी या दोघांचं सांत्वन केलं आणि त्यांना सांगितलं की आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा. त्यानंतर तयार झाली ती दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. १८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. १८९६ मध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव सुरु झाला. नंतरच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं. मात्र त्यांनी सुरु केलेली गणेश उत्सवाची परंपरा कायम राहिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button