breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवारांच्या नावाची चर्चा; भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता…

पुणे : पुण्याच्या पालकमंत्रिपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय जनता पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते, आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या लोकप्रतिनिधींसह शिंदे गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करू नये, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांचा पुण्यात दौरा झाला असला, तरी त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम, बैठका घेण्याचे टाळले. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतरच सार्वजनिक कार्यक्रम, बैठका घेतल्या जातील, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. तर, विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील स्थानिक आमदार आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर शहर, जिल्ह्यातील भाजपमध्ये पाटील हेच ज्येष्ठ नेते आहेत. पुणे शहरात भाजपचे पाच, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन, तर जिल्ह्यात एक, असे आठ आमदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचेही पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत.

जिल्ह्यात पूर्वीपासून शिवसेनेचा संघर्ष प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे. या पार्श्वभूमीवर पवार हे पालकमंत्री झाले, तर ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांना त्याचा फायदा होईल, अशी भीती या नेत्यांना आहे. विशेषत: भाजपच्या पुण्यातील गटातटांचा विचार करता, चंद्रकांत पाटील यांचे पालकमंत्रिपद गेले, तर आपले भवितव्य काय, अशी अस्वस्थता अनेकांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पालकमंत्रिपदी पवार यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, तर भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी केली आहे. मात्र, याबाबत अजित पवार यांच्या गटाची भूमिका अद्याप समजू शकलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेतील सहभागानंतर नऊ मंत्र्यांना अद्यापही पालकमंत्रिपदी नियुक्त करण्यात आलेले नाही. पावसाळी अधिवेशनानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्ती केल्या जातील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जागा लढविताना पुण्याच्या पालकमंत्रिपदी भाजपचा नेता असावा, अशी भाजपमधील चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांची मागणी आहे. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे दोन्ही ‘राष्ट्रवादी’चे वरिष्ठ नेते पुण्यातून आहेत. त्यात पवार उपमुख्यमंत्री आहेत; ते पालकमंत्री नसले, तरी त्यांच्या पक्षाचे आमदार किंवा नेत्यांची कामे होण्यात फारशी अडचण येणार नाही, असा या नेत्यांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद राहिल्यास निवडणुकीत भाजपला फायदा होईल, असे या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पुण्याची खासदारकी महत्त्वाची
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर अद्याप पोटनिवडणूक झालेली नाही आणि ती जाहीर होण्याची चिन्हेही नाहीत. आगामी लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचा पालकमंत्री असणे गरजेचे असल्याचे पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button