breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Covid-19: ‘चीनकडून २०१५ मध्येच करोनाचा जैविक अस्त्र म्हणून विचार’

  • अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याकडे कागदपत्रे

बीजिंग |

करोना विषाणूंचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोविड १९ विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे अगोदरच म्हणजे २०१५ मध्ये केला होता, असे दिसून आले आहे. तिसरे जागतिक महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल असेही भाकित त्यावेळी चिनी वैज्ञानिकांनी केले होते अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रात दिली आहे. ही कागदपत्रे खरी की खोटी याची शहानिशा सायबर तज्ज्ञांनीही केली असून ती कागदपत्रे खरी आहेत. ब्रिटनमधील ‘दी सन’ या वृत्तपत्राने ‘दी ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने प्रथम प्रसारित केलेल्या कागदपत्राच्या आधारे ही माहिती दिली असून अमेरिकी परराष्ट्र खात्याने ही कागदपत्रे मिळवली होती. त्यात म्हटल्यानुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडर्सनी करोना विषाणूंचा वापर जैविक युद्धासाठी करता येईल असे म्हटले होते. अमेरिकी अधिकाऱ्यांनी मिळवलेली सदर कागदपत्रे चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी तयार केली होती. तो काळ २०१५ मधला होता. त्यावेळी करोना साथ होण्याची सुतराम शक्यता कुणाला वाटली नव्हती. कोविड १९ विषाणू कुठून आला याची पाळेमुळे शोधून काढण्याचे काम अमेरिकेने हाती घेतले असून त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार चिनी वैज्ञानिकांनी सार्स करोना विषाणूंचे उदाहरण हे जनुकीय किंवा जैविक अस्त्र म्हणून त्यावेळी दिले होते. करोना विषाणूंचा फार मोठा समूह असून त्यामुळे माणसाला साध्या सर्दीपासून गंभीर श्वसन रोगापर्यंत अनेक रोग होतात. त्यात सार्सचाही समावेश आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कागदपत्रातील संदर्भानुसार जैविक अस्त्रांचा हल्ला केल्यास शत्रूची वैद्यकीय यंत्रणा कोलमडून पडेल असे सांगण्यात आले होते. अमेरिकी हवाई दलाचे कर्नल मायकेल जे. ऐनकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या कागदपत्रात जैविक अस्त्रांच्या मदतीने तिसऱ्या जागतिक महायुद्धाची शक्यता चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी २०१५ मध्ये वर्तवली होती. लष्कराने असे म्हटले होते की, २००३ मध्ये करोनाचा विषाणू सार्सच्या रूपाने चीनमध्ये आला होता. त्याची मानवनिर्मित आवृत्ती तयार केली तर ते चांगले जैविक अस्त्र ठरू शकेल व ते दहशतवाद्यांनाही मागे टाकील असा उल्लेख त्यात आहे. चीनच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक बडय़ा व्यक्तींची नावे या कागदपत्रांच्या लेखकात असून या कागदपत्रांवर आधारित ‘व्हॉट रिअली हॅपन्ड इन वुहान’ हे पुस्तक बाजारात येणार आहे. चीनने सुरुवातीला २०१९ मध्ये वुहान शहरात पहिला करोना रुग्ण सापडल्याचे जाहीर केले. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने ती महासाथ जाहीर केली. ऑस्ट्रेलियाचे खासदार टॉम टय़ुगेंडाट व ऑस्ट्रेलियाचे राजकीय नेते जेम्स पॅटर्सन यांनी म्हटले आहे की, या कागदपत्रातला मजकूर काळजी करायला लावणारा असून कोविड १९ कुठून आला याबाबत चीनची भूमिका पारदर्शक नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. परराष्ट्र समितीचे अध्यक्ष टय़ुगेंडाट यांनी म्हटले आहे की, चीनला सुरुवातीपासूनच जैविक अस्त्रात स्वारस्य आहे व ते धोकादायक ठरले आहे. अगदी कडक नियंत्रणे असली तरी ही शस्त्रे धोकादायक असतात. या कागदपत्रांनी चीनच्या आसुरी महत्त्वाकांक्षा उघड झाल्या असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना जैविक अस्त्रांबाबत सल्ले देण्यात आले.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक पीटर जिनिंग यांनी सांगितले की, सदर कागदपत्रे धोका उघड करणारी आहेत. चीनविषयी संशय निर्माण करणारी ही कागदपत्रे असून ती गांभीर्याने घेतली पाहिजेत. चिनी वैज्ञानिकांनी करोना विषाणूंच्या प्रकारांचा जैविक अस्त्रे म्हणून वापर करण्याचा सल्ला दिला होता. ती जैविक अस्त्रे कशी तयार करता येतील याचीही माहिती दिली होती. जिनिंग्ज यांच्या मते लष्करी वापराचा जैविक करोना विषाणू चुकून बाहेर पडला असावा व त्यातून ही साथ निर्माण झाली. त्यामुळेच चीनने बाहेरच्या तपासकर्त्यांना सुरुवातीला येऊ दिले नाही व नंतर पुरावे नष्ट करून टाकले. जर हा विषाणू चीनच्या प्राण्यांच्या बाजारपेठेतून पसरला असेल तर त्याचा शोध घेण्यात खरेतर चीनचे हित होते पण प्रत्यक्षात तसे नाही, हा विषाणू तयार करण्यात आलेला असावा. पीपल्स लिबरेशनच्या कागदपत्रांवर एकूण १८लेखकांची नावे असून त्यातील काही वैज्ञानिक तर काही शस्त्रास्त्र तज्ज्ञ आहेत. सायबर सुरक्षा तत्र रॉबर्ट पॉटर यांनी सांगितले की, चीनच्या सरकारची ही कागदपत्रे बाहेर फुटली आहेत त्यांची सत्यता आम्ही पडताळली असून ही कागदपत्रे खरी आहेत. त्यात काहीही बनावट नाही. पण त्या कागदपत्रांचा अर्थ कुणी कसा लावायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

  • चीनचा प्रत्यारोप

चीनच्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने ही बातमी चीनची बदनामी करण्यासाठी दिल्याचा आरोप दी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रावर केला आहे. जैविक दहशतवादाचा अभ्यास करण्याच्या हेतूने लिहिलेल्या क्रमिक पुस्तकासारखा हा तपशील असून त्याचा अर्थ चीनने कृत्रिम करोना विषाणू तयार केला असा लावण्यात आला आहे. यात चीनची बदनामी करण्याचा हेतू असल्याचे इस्ट चायना नार्मल युनिव्हर्सिटीचे संचालक व प्राध्यापक शेन हाँग यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियातील चीनविरोधी शक्ती आम्हाला बदनाम करीत आहेत. त्यासाठी पत्रकारितेतील नीतिमूल्यांचे उल्लंघन करून कागदपत्रांचा चुकीचा अर्थ लावत आहेत असे शेन हाँग यांनी म्हटले आहे.

वाचा- देशात लसीकरण मोफतच! धोरणाचे केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात समर्थन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button