#CoronaVirus | परदेशी न जाताच महिलेला लागण, चार नातेवाईकही बाधित
पुणे | पुण्यात ‘कोरोना’चा विळखा वाढत असल्याचं चित्र आहे. परदेशी न जाताच पुण्यातील महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कात आल्यामुळे चार नातेवाईकही बाधित झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव (कम्युनिटी स्प्रेड) सुरु झाल्याच्या शक्यतेला बळ मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 वर पोहोचला आहे.
पुण्यात परदेशी प्रवास न केलेल्या किंवा त्यांच्याशी थेट संपर्क न आलेल्या 41 वर्षे महिलेला व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. या महिलेची प्रकृती गंभीर असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दिल्लीतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन माहिती घेतली आहे. या महिलेच्या संपर्कातील सहापैकी चार जणांना बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट म्हटलं आहे. चार व्यक्तींमध्ये महिलेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचबरोबर तिची बहीण, बहिणीचा पती आणि मुलीला बाधा झाली आहे. या सर्वांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पाचही जणांची परदेश प्रवास किंवा संबंधित प्रवाशांच्या संपर्काची कोणतीही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव सुरु झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.