breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: करोनाचे भय आता संसदेतही

गायिकेमुळे नेत्यांचे स्वविलगीकरण; राष्ट्रपती भवनातील भेटीगाठीही बंद

नवी दिल्ली: सिनेगायिका कनिका कपूर यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्यामुळे शुक्रवारी करोनाची भीती थेट संसदेत पोहोचली. कनिका यांची उपस्थिती असलेल्या लखनौमधील मेजवानीला हजर राहिलेले तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन, भाजपच्या नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे सुपुत्र दुष्यंत सिंह या तिघांनी स्वविलगीकरण जाहीर केले आहे.

लखनौमध्ये रविवारी झालेल्या मेजवानीत सहभागी झालेले दुष्यंत सिंह संसदेतही आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली होती. राष्ट्रपतींनी उत्तर प्रदेश व राजस्थानच्या खासदारांना बोलावले होते. त्यात अनुप्रिया पटेल, जितेंद्र प्रसाद यांचा समावेश होता. दीपेंदर हुडा यांनी गुरुवारी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आता दक्षतेचा भाग म्हणून राष्ट्रपतींनी सर्व भेटीगाठी रद्द केल्या आहेत.

लंडनहून परतलेल्या गायिका कनिका कपूर या लखनौमध्ये दोनशे जणांच्या उपस्थितीत झालेल्या मेजवानीत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता असू शकते. या मेजवानीत दुष्यंत यांच्याशेजारी आपण अडीच तास बसलो होतो, असे डेरेक ओब्रायन यांनी सांगितले. कनिका कपूर या ९ मार्च रोजी मुंबईला परतल्या. त्यानंतर त्या लखनौला गेल्या. मुंबई विमानतळावर आपण प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याचा दावा त्यांनी केला. लागण झाल्याची बाब लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे. त्यांना लखनौमधील रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

‘‘लंडनहून परत आल्यावर विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. गेल्या चार दिवसांपासून ताप येत असल्याने स्वत:हून करोनासाठी वैद्यकीय चाचणी केली. आपण स्वत: आणि कुटुंबीयांतील सदस्यांनीही विलगीकरण केले आहे,’’ अशी माहिती कनिका यांनी ट्वीटद्वारे दिली.

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी देखील स्वविलगीकरण केले असून सभागृहात गैरहजर राहण्याची रीतसर परवानगी मागितली आहे. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ती मान्य केली. सौदी अरेबियाहून परतलेले भाजपचे नेते सुरेश प्रभू तसेच व्ही. मुरलीधरन यांनीही स्वविलगीकरण केले आहे. किमान नऊ  राजकीय नेत्यांनी स्वविलगीकरण केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button