Uncategorized

मुंबईला पाणीपुरवठा करणारा जिल्हा तहानलेला, कोकण, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह ग्रामीण भागांत चिंता

 मुंबई/ठाणे |मुंबई महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे केंद्र असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह ठाणे शहरातील काही भाग, कल्याण-डोंबिवली शहरातही पाणीपुरवठ्याच्या अकार्यक्षम यंत्रणेमुळे पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे मुंबईपर्यंत पाणी पोहाचवणाऱ्या शहरे आणि ग्रामीण भागांची झोळी रितीच राहत आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरणांचा तालुका असलेल्या शहापूरमधील धरणांमधून मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शहरांना पाणीपुरवठा होतो. मात्र, याच शहापूरमधील गावे वर्षानुवर्षे पाण्यासाठी झगडत आहेत. धरणांमध्ये पाणी भरलेले असतानाही या भागातील आदिवासी पाड्यांमध्ये ते पोहोचत नसल्यामुळे मैलोनमैल प्रवास करून ग्रामीण भागातील महिलांना पाणी आणावे लागत आहे. जिल्ह्यातील शहरांलगतच्या ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या भागातील पाण्याचे माप त्यानुसार वाढलेले नसल्याने भिवंडी तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवते. ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांतील पाणीपुरवठ्याचे असमतोल वाटप, जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईचे संकट आहे. ठाणे शहरात घोडबंदर पट्ट्यातील टोलेजंग इमारतींना बाराही महिने टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तर दिव्यासारख्या भागांमध्ये पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे विकतच्या पाण्यावर गुजराण करण्याची वेळ आली आहे.

तुलनेने यंदा मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. मुंबईसाठी असलेल्या सर्व सहा धरणांमध्ये मिळून मागील तीन वर्षांच्या तुलनेमध्ये सर्वाधिक पाणीसाठा सध्या आहे. तीन धरणांमध्ये मागील वर्षी काहीसा कमी, तर दोन धरणांमध्ये मागील वर्षीच्या दुप्पट पाणीसाठा असल्याने मुंबईकरांसाठी उन्हाळा सुसह्य राहण्याची शक्यता आहे. ठाणे परिसरातील धरणांमध्ये एप्रिलअखेर ४० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा असून, ही स्थिती समाधानकारक मानली जात आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीचे संकट नसल्याचे लघुपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. धरणांमध्ये समाधानकारक पाणी असले तरी वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि गळतीमुळे ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीटंचाईची भेडसावत आहे.

मुंबईसाठीच्या धरणांतील पाणीसाठा

धरण पाणीसाठा टक्केवारी

(दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा ४५,७८२ २०.१६

मोडक सागर ५४,९१७ ४२.६०

तानसा ३७,५२७ २५.८७

मध्य वैतरणा ७९,१२३ ४०.८८

भातसा २,२०,१५० ३४.३३

तुळशी ३,५३२ ४३.९०

विहार ८,२२८ २९.७७

कोकणातही पुरेसे पाणी

कोकणातील काही महत्त्वाच्या धरणांचा विचार केल्यास ही धरणे जवळपास निम्मी भरलेली आहेत. पालघर जिल्ह्यातील धामणी धरण २.६३ दशलक्ष लिटर या क्षमतेच्या जवळपास ४९ टक्के भरले आहे. मागील वर्षी हे धरण फक्त ४० टक्के भरले होते. पालघरमधीलच कवडास बंधाऱ्यात सध्या ९९६० दशलक्ष लिटर या क्षमतेच्या ९० टक्के जलसाठा आहे. हा साठा मागील वर्षी ७६ टक्केच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण ४.४७ दशलक्ष लिटर या पूर्ण क्षमतेच्या ६५ टक्के भरले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत हे धरण ५७ टक्केच भरले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button