breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

‘यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

Chinmay Mandlekar | अभिनेता चिन्मय मांडलेकरने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मुलाच्या नावाचा संबंध अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेशी जोडल्यामुळे कुटुंबीयांना मानसिक त्रास नको म्हणून अभिनेत्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.

चिन्मयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. चिन्मय मांडलेकर म्हणाला, नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायानं मी एक अभिनेता आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, निर्माताही आहे. काल माझ्या पत्नी नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. माझ्या मुलाच्या जहांगीर या नावावरून आम्हाला होणारं ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या, अश्लाघ्य अशा कमेंट्सबाबतचा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतरसुद्धा या कमेंट्स काही कमी झाल्यात का? तर अजिबात नाही. खरं तर त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत.

एक व्यक्ती म्हणून मला याचा खूप त्रास होतो. मी अभिनेता आहे; पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला सोशल मीडियावरून कुठल्याही पद्धतीचा जर मानसिक त्रास होत असेल, तर त्याच्यासाठी मी बांधील नाहीय. माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता. तुम्हाला ते आवडलं, नाही आवडलं ते तुम्ही प्रत्यक्षात भेटून किंवा सोशल मीडियावरही सांगू शकता. पण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे, असं मला वाटत नाही. मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक माध्यमांवरून मी यापूर्वी बोललो आहे. जर कोणाला हे जाणून घेण्याची इच्छा असेल, तर त्यांनी ते व्हिडीओज जाऊन पाहावेत. काल नेहानंसुद्धा जेव्हा व्हिडीओ बनवला तेव्हा त्याची कारणमीमांसा केली म्हणून ती करण्याकरिता मी आता वेळ वाया घालवणार नाही.

हेही वाचा     –      मोफत आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे, जाणून घ्या.. 

मला इतकंच सांगायचंय. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का?, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण- माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झालाय. आज तो ११ वर्षांचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होतंय. त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम दिलं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की, यापुढे मी ही भूमिका करणार नाही. कारण- मी करीत असलेलं काम, मी करीत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून व एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे, असं चिन्मय म्हणाला.

मला याचं वाईट वाटतंय का? तर हो मला खूप वाईट वाटतंय. कारण- माझ्या मनात महाराजांबद्दलची जी भक्ती किंवा श्रद्धा आहे. त्याच भक्ती आणि श्रद्धेची एक अभिव्यक्ती म्हणजे माझी भूमिका होती आणि वैयक्तिक आयुष्यात खूपशा अशा गोष्टी आहेत. अगदी माझ्या गाडीतसुद्धा जिथे लोक साधारणपणे गणपतीची मूर्ती ठेवतात तिथे महाराजांची मूर्ती आहे आणि हा दिखावा नाही आहे; हे प्रेम आहे. ही श्रद्धा आहे. पण, आपल्या श्रद्धेचं स्पष्टीकरण मी लोकांना का द्यावं? आणि लोकांनी तरी ते का ऐकावं. त्यांना काय दिसतं, तर मुलाचं नाव जहांगीर ठेवलं.

महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं. पण, जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या ११ वर्षांच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल, तर त्यांची माफी मागून मी तुम्हा सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो की, यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही. नमस्कार, असं चिन्मय मांडलेकर म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button