breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रत्येक कामाचा दर्जा चांगला ठेऊन प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी |महाईन्यूज|

नागरिकांची विश्वासार्हता हेच आपले बलस्थान असून आपण करीत असलेल्या कामाचे पर्यवेक्षण ते करीत असतात. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला ठेऊन प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडा असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी प्रशासनाला दिले.

महापालिकेच्या चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयास आज आयुक्त राजेश पाटील यांनी भेट देऊन प्रभाग क्र. १६ आणि १७ मधील कामे तसेच विविध उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. प्रभाग स्तरावर चाललेली कामे, येथील समस्या, प्रश्न तसेच हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, पावसाळी कामे, कोरोना विषयक नियोजन, अतिक्रमण अशा विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या माधुरी कुलकर्णी, प्रज्ञा खानोलकर, संगिता भोंडवे, नगरसदस्य मोरेश्वर भोंडवे, बाळासाहेब ओव्हाळ, स्वीकृत सदस्य बिभीषन चौधरी, ब क्षेत्रीय अधिकारी सोनम देशमुख, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, नितीन देशमुख, अभय ढवळे, अनिल सुर्यवंशी, सुनिल वाघुंडे, अनिल शिंदे, तालेरा रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, आदींसह स्थापत्य, विद्युत, स्थापत्य क्रीडा, पाणीपुरवठा, बांधकाम परवानगी, नगररचना, स्थापत्य उद्यान, झोनिपु स्थापत्य, आरोग्य, जलनि:सारण, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, कोणताही मोठा प्रकल्प हाती घेताना त्या कामात इतर विभागांच्या कामाचा भाग येत असतो. अशा वेळी एकत्रितपणे या विभागांनी नियोजन केल्यास अडचणी उद्भवणार नाहीत. कामाचे डिझाईन करताना पुढील २५ वर्षांचा विचार केला पाहिजे. आपल्या कामाबाबत तक्रारी येणार नाहीत याची दक्षता अधिकारी कर्मचा-यांनी घ्यावी. कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी आणि पर्यवेक्षण करा. आपली विश्वासार्हता ही कामावर अवलंबून असते, त्यामुळे कामचुकारपणा करु नका. समन्वय ठेवून अडचणींतून मार्ग काढा. नागरिकांची गैरसोय होईल अशी कोणतीही गोष्ट करु नका अशा सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी दिल्या.

नालेसफाईचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले. स्थापत्य, आरोग्य आणि जलनि:सारण विभागाने एकत्रितपणे यासाठी काम करावे. कोठेही पावसाचे पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त पाटील यांनी दिला.

रस्त्यांसाठी भूसंपादन करण्याच्या कामाला गती द्यावी, एम बी कॅम्प येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात यावी, अरुंद रस्ते रुंद करावेत, मुकाई चौकामध्ये ओपन जिम बांधण्यात यावी, चौक आणि रस्त्यांचे सुशोभिकरण करावे, काही भागात पाणी मीटर बसवलेले नसल्याने ते तातडीने बसविण्यात यावेत, ज्या भागात पाणी शिरते त्या भागाची पाहणी करुन त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, भूसंपादनाबाबत जागा मालकांशी समन्वय साधून त्यावर तोडगा काढावा, रस्त्यांमध्ये अडथळा ठरणा-या उच्च दाबाच्या टॉवरबाबत नियोजन करावे, कामासांठी पुरेशी तरतूद उपलब्ध करुन द्यावी, पाणी पुरवठा नियोजन सुरळीत करावे, नाल्यांची कामे तातडीने करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावे, विविध उद्यानांची कामे, रेंगाळलेली कामे, नालेसफाई, जलनि:सारणची कामे तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना नगरसदस्यांनी यावेळी मांडल्या.

बैठकीत आलेल्या सूचना आणि मुद्दयांबाबत तसेच झालेले, चालू असलेले आणि भविष्यात हाती घेण्यात येणा-या प्रकल्पांच्या कामांबाबत आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांकडून माहिती घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.

प्रत्येक भागाचा विचार करुन रस्ते आणि चौक सुशोभिकरणाचे काम हाती घेऊन आकर्षक वृक्षारोपण करावे असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले. नागरिकांना पायी फिरण्यासाठी प्रभागात पाथवे तयार करावा, मोठ्या रस्त्यांवर वृक्षारोपण करावे असेही त्यांनी सांगितले. प्रेमलोक पार्क, वाल्हेकरवाडी आदी भागात पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत, त्यामुळे या भागातील पाणी मीटर बसविल्याच्या आकडेवारीसह सर्व कारणांचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले. प्रभाग स्तरावरील कोविड केअर सेंटर, फिव्हर क्लिनिक, कोविड चाचणी केंद्र याबद्दल डॉ. राजेंद्र फिरके यांनी बैठकीत माहिती दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button