किलोभर चांदीला लाखावर भाव
आंतरराष्ट्रीय निवडणुकीचा प्रभाव अद्यापही सोने, चांदीवर कायम

जळगाव : आंतरराष्ट्रीय निवडणुकीचा प्रभाव अद्यापही सोने, चांदीवर कायम आहे. अमेरिकेत अध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर त्यांनी विविध वस्तूंवर कर वाढविण्यास सुरवात केली होती. त्याचाच परिणाम म्हणून सोने, चांदीच्या भावात सतत वाढ होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजार ८०० रुपयांची (प्रतिदहा ग्रॅम) वाढ, तर चांदीत पाच हजार ५०० (प्रतिकिलो) रुपयांची वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव ९० हजार ६४० रुपये दहा ग्रॅम (जीएसटीसह), तर चांदीने लाख रुपयांचा टप्पा ओलांडून आज एक लाख चार हजार ३० रुपये (प्रतिकिलो, जीएसटीसह) गेली आहे. सोने, चांदीचे भाव वाढल्याने लग्नसराईसाठी सोने खरेदी करणाऱ्या वधू पित्यांची दमछाकहोत आहे.
नवीन वर्षात (२०२५) सोन्याच्या भावात नवीन वर्षात घट झाली होती. नंतरही जागतिक आणि स्थानिक आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली होती. यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांना भाववाढीचा मोठा फटका बसत आहे. ३० जानेवारीस सोने ८१ हजार ३००, तर चांदी ९३ हजार ५०० वर गेली होती. १ फेब्रुवारीस सोन्याच्या भावात अकराशे रुपयांची, तर चांदीत ५०० रुपयांची वाढ झाली होती.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अध्ययावत इमारत!
फेब्रुवारी महिन्यात सोने ८३ हजार २०० प्रतिदहा ग्रॅमपर्यंत पोचले (विनाजीएसटी) होते. तर चांदी ९५ हजारांवर गेली (विनाजीएसटी) होती. जीएसटीसह सोन्याच्या भावाचा विचार करता, सोने ८५ हजार ७०० प्रतिदहा ग्रॅम, तर चांदी ९७ हजार ८५० (प्रतिकिलो) वर होते. मार्च महिन्याचा विचार करता १ मार्चला सोने ८५ हजार २०० (प्रतिदहा ग्रॅम), तर चांदी ९५ हजार ५०० वर होती. शनिवारी (ता. १५) सोने ८८ हजारांवर, तर चांदी एक लाख एक हजारांचा भाव खात आहे.
सोने उच्चांक गाठणार
लग्नसराईची धामधूम सुरू असताना सोन्याच्या भावात होणारी वाढ ग्राहकांसाठी मोठी चिंता निर्माण करीत आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोने हा एक महत्त्वाचा भाग असतो. आता महाग झाल्याने ग्राहकांना खर्चाचा ताळमेळ बसविताना कसरत करावी लागत आहे. तज्ज्ञांच्या मते २०२५ मध्ये सोन्याचे भाव नवीन उंची गाठू शकतात. देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव एक लाखापर्यंत प्रतिदहा ग्रॅमपर्यंत पोचू शकतो. आगामी काळात नववर्ष गुढीपाडवा येत आहे. हा एक मुहूर्त असल्याने तोपर्यंत सोने, चांदीचे भाव तेच राहतात की वाढतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.