भुसावळ तालुक्यात अवैध वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र

भुसावळ : तालुक्यात सुमारे तीन ते चार हजार वीटभट्ट्या असून, त्यातील बहुतांश वीटभट्ट्यांना तहसील कार्यालयाची परवानगी नाही. पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यात कंडारी, वरणगाव, सुसरी, कुऱ्हा, साकेगाव, बोहार्डी, टहाकळी, सुनसगाव, फुलगाव, जाडगाव रोड, तळवेल शिवार विल्हाळे या विविध ठिकाणी किमान तीन ते चार हजारापेक्षा अधिक वीटभट्ट्या सुरू आहेत. मात्र, यातील बोटावर मोजण्याइतक्यात वीटभट्ट्यांनी भुसावळ तहसील कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. यामुळे अवैध वीटभट्ट्यांमुळे आरोग्यासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरासह परिसरात वीट पांरपारिक पद्धतीने बनविली जाते, मातीचे साचे बनवून ते एकमेकांवर रचून भट्टी बनवली जाते. दगडी कोळशाचा यामध्ये इंधन म्हणून वापर करण्यात येतो.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी हवी अध्ययावत इमारत!
मात्र दगडी कोळसा जाळल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायूमधील सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील डायऑक्साईडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात, तसेच कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या विषारी वायुमुळे वीटभट्ट्या असलेल्या परिसरातील तापमानात वाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो. या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केलेले असताना देखील या सर्व नियम व अटींचे उल्लंघन करून बिनबोभाट सुरू आहेत. मात्र यामुळे भुसावळ आणि परिसरातील शेतीवर, नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर मोठा विपरित परिणाम होत आहे.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
वीटभट्ट्यांविषयी भुसावळ तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याऱ्या अटीवर माहिती सांगितली, की प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नाहरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय तहसील कार्यालाकडून वीटभट्टीला अधिकृत परवानगी देण्यात येत नाही. बेकायदेशीर वीटभट्ट्यांवर प्रतिबंध घालणे, स्थानिक तहसील प्रशासनाकडून अपेक्षित असते. मात्र भुसावळ तहसीलचे अधिकारी या समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्याने बिनबोभाटपणे बेकायदेशीर वीटभट्ट्या सुरू आहेत. वीट बनविण्यासाठी माती लागते. ही माती तापी नदीकाठावरून सहज उपलब्ध होते.
बहुतांशी वीटभट्टीचालकांनी भुसावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भट्ट्या सुरू केलेल्या आहेत. त्यासाठी तापीपात्रातून अवैधपणे भरमसाठ मातीचे उत्खनन करीत आहेत. विशेष म्हणजे, हतनूर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या व नदीकाठावरील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातून अवैधपणे माती विक्री सुरू केली आहे. यामुळे नदीच्या नैसर्गिक पात्रात बदल देखील होत असून, पावसाळ्यात नदी काठावरील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. धुराची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.
..अशी मिळते परवानगी
वीटभट्टी सुरू करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच यांचा ना हरकत दाखला, मंडल अधिकाऱ्याने प्रत्यक्ष जागा पाहणी केल्याचा दाखला, प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी, शहर हद्दीत असल्यास पालिकेचा ना हरकत दाखला तहसीलदारांकडे सादर करावा लागतो. सर्व अटी व शर्तींच्या अधीन राहून तहसीलदार वर्षभरासाठी वीटभट्टी सुरू करण्याची परवानगी देतात.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
भुसावळ तालुक्यात शासन निर्णयानुसार काही व्यावसायिकांना वीटभट्टीचे परवाने महसूल विभागाने अटी-शर्तींवर दिलेले आहेत. त्या व्यतिरिक्त चौकशीदरम्यान अवैध वीटभट्ट्या आढळून आल्यास किंवा अटी-शर्तींचे उल्लघन होत असल्यास रीतसर कारवाई करण्यात येईल.
– नीता लबडे, तहसीलदार, भुसावळ