गौतम अदानी यांची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक गुंतवणूक; 60,000 कोटींच्या ‘Adani Healthcare Temples’ प्रकल्पाची घोषणा

मुंबई : देशातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी आज आरोग्य क्षेत्रात भव्य आणि ऐतिहासिक पाऊल टाकत तब्बल 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. आपल्या कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेली ही गुंतवणूक केवळ आरोग्य सेवा पुरवण्यासाठी नसून, एक “उद्यमशील क्रांती घडवणारा उपक्रम” ठरणार असल्याचे अदानी यांनी जाहीर केले.
या प्रकल्पांतर्गत ‘Adani Healthcare Temples’ या नावाने 1000 खाटांची एकात्मिक, बहुआयामी रुग्णालये उभारली जाणार आहेत. प्रारंभी मुंबई आणि अहमदाबाद येथे हे रुग्णालय प्रकल्प राबवले जातील. या रुग्णालयांची रचना आणि डिझाईन हे जगप्रसिद्ध अमेरिकन मेयो क्लिनिक यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.
हेही वाचा – ‘महानगरपालिका निवडणुकीसाठी EVM तपासणी, तयारीला गती’; राज्य निवडणूक आयुक्त
अदानी यांच्या म्हणण्यानुसार, या रुग्णालयांमध्ये केवळ उपचारच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधला जाईल. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता , रोबोटिक आणि नाविन्यपूर्ण शस्त्रक्रिया प्रणाली, ग्रामीण भागांसाठी मोबाइल थिएटर्स आणि भविष्यात विस्तारता येतील अशा स्केलेबल आरोग्य सेवा उपलब्ध असतील.
या उपक्रमामुळे भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित होणार असून, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना एकाच ठिकाणी जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.अदानींचा हा प्रकल्प सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जात असून, आरोग्य व तंत्रज्ञानाच्या संगमातून भारताच्या आरोग्य व्यवस्थेला भक्कम पायाभूत सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





