breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Budget2021 पहिल्या डिजीटल जनगणनेची घोषणा! सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच

नवी दिल्ली – कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या पार्श्वभूमीवर आज मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प वाचनास सुरुवात केली. कोरोनामंदीतून सावरण्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती देण्यासाठी आणि त्याचवेळी देशातील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या तणावमुक्त करण्यासाठी केंद्राकडून नेमकी कोणती पावलं उचलली जातील, हे पाहण्यासाठी देशवासीयांची अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले होते.

दरम्यान, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार असून दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे. याचदरम्यान निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून देशाचा आर्थसंकल्प आज, 1 फेब्रुवारीला सादर केला. निर्मला सीतारमण यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे.

Budget2021
१२.५६ : सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच
आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

१२.५५ : एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा
एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा देण्याचा निर्णय – अर्थमंत्री

१२.५३ : जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार
जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी ६ ऐवजी ३ वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार – अर्थमंत्री

१२.४९ : २०२० मध्ये रेकॉर्डब्रेक आयकर रिटर्न
२०२० मध्ये रेकॉर्डब्रेक ६ कोटी ४८ लाख लोकांनी आयकर रिटर्न भरल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

१२.४४ : सरकारला ८० हजार कोटींच्या निधीची गरज
कोरोनामुळे सरकारसमोर मोठे आर्थिक आव्हान असून ८० हजार कोटींच्या निधीची गरज असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले आहे. ८० हजार कोटींचा निधी जमा करण्यासाठी अनेक योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.

१२.४१ : टॅक्स ऑडिटची मर्यादा १० कोटींवर
टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरुन १० कोटींवर – अर्थमंत्री

१२.४१ : गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात
गुंतवणूक वाढवण्यासाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय – अर्थमंत्री

१२.३२ : ७५ वर्षांवरील नागरिकांना आयटी रिटर्नपासून मुक्ती
७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

१२.२९ : पहिल्या डिजीटल जनगणनेची घोषणा
भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिजीटल जनगणना करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६८ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे – अर्थमंत्री

१२.२९ : आपत्कालीन निधीत मोठी वाढ, 30 हजार कोटींची तरतूद
कोरोना महामारीमुळे देशाला आर्थिक पातळीवर मोठा फटका बसला. अशा आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन निधीत भरीव वाढ केली आहे. केंद्राने आपत्कालीन निधी 500 कोटींवरून 30 हजार कोटींपर्यंत वाढवला आहे.

१२.२७ : 74 हजार कोटी 14 राज्यांना देण्यात येणार
डिसेंबर 2020 मध्ये 14व्या वित्तीय आयोगाने राष्ट्रपतींना अहवाल सादर केला. जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांना केंद्र सरकार 74 हजार कोटी रुपये देणार

१२.२६ : वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के
२०२०-२१ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ९.५ टक्के – अर्थमंत्री

२.२६ : डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी १५०० कोटी
डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून १५०० कोटींची तरतूद केली जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

१२.२५ : गगनयान मिशनचे पहिले मानवरहित लॉन्च डिसेंबर 2021मध्ये होणार
न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यंदा PSLV-CS51 लॉन्च करेल, गगनयान मिशनचे पहिले मानवरहित लॉन्च यावर्षी डिसेंबरमध्ये होईल, अर्थमंत्र्यांची माहिती

१२.२४ : चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करणार
आत्मनिर्भर स्वास्थ योजनेंतर्गत चार नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची (एनआयव्ही) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. दरम्यान, देशात सध्या पुणे शहरात एकमेव एनआयव्ही अस्तित्त्वात आहे.

१२.२० : महिलांना सर्व श्रेणींमध्ये काम करण्याची परवानगी
महिलांना सर्व श्रेणींमध्ये काम करण्याची परवानगी, नाईट शिफ्टमध्येही काम करता येणार, त्यांना सुरक्षाही प्रदान केली जाईल – अर्थमंत्री

१२.२० : गोव्याला ३०० कोटी रुपयांचा निधी
गोवामुक्तीला ६० वर्षपूर्तीनिमित्त ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार – अर्थमंत्री

१२.१९ : १०० नव्या सैनिक स्कूल उभारणार
देशात जवळपास 100 नवीन सैन्य शाळा बनवल्या जातील, लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ बनवण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा

१२.१६ : सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन कायदा
सर्व क्षेत्रांमध्ये किमान वेतन कायदा लागू करण्यात येणार – अर्थमंत्री

१२.१४ : जम्मू-काश्मीरमध्ये गॅस पाइपलाईन प्रोजेक्ट
उज्वला गॅस योजना आणखी १ कोटी लोकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. गॅस वितरण नेटवर्कमध्ये पुढील तीन वर्षात अजून १०० जिल्हे जोडणार आहोत. जम्मू-काश्मीरमध्ये गॅस पाइपलाईन प्रोजेक्ट सुरु केला जाईल – अर्थमंत्री

१२.१३ : असंघटित मजुरांसाठी ऑनलाईन पोर्टल
असंघटित मजुरांसाठी ऑनलाइन पोर्टल तयार करणार – अर्थमंत्री

१२.०७ : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दीष्ट
आमचे सरकार शेतकरी हितासाठी वचनबद्ध आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दीष्ट असून गहू उत्पादकांना ७५ हजार ६० कोटींच्या मदतीकरता तरतूद असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

१२.०३ : गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा
२०१२मध्ये शेतकऱ्यांना किमान हमीभावापोटी ३३ हजार कोटी रुपये दिले होते, २०१५मध्ये शेतकऱ्यांना ५२ हजार कोटी रुपये दिले तर २०२०-२१ मध्ये हा आकडा ७५ हजार कोटी एवढा वाढला. गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांना फायदा झालाय – अर्थमंत्री

१२.०२ : शेतकऱ्यांचा उल्लेख येताच विरोधकांचा गदारोळ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.

१२.०१ : सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद
बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री

११.५८ : एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार
यावर्षी एलआयसी कंपनीचा आयपीओ बाजारात येणार – अर्थमंत्री

११.५२ : सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी
सरकारी बँका सक्षम करण्यासाठी २० हजार कोटी रुपयांच्या भांडवलाची तरतूद – अर्थमंत्री

११.४८ : नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी, तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद
महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी, तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

११.४७ : विमा कायद्यात सुधारणा
विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७२ टक्के करणार – अर्थमंत्री

११.४४ : १५ वर्ष जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुन्या वाहनांसाठी ‘स्क्रॅपिंग पॉलिसी’ जाहीर केली आहे. २० वर्षांनी खासगी वाहनांसाठी तर व्यवसायिक वाहनांची १५ वर्षांनी फिटनेस टेस्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली.

‘जुनी वाहनं हटवण्यासाठी आणि प्रदुषणापासून बचावासाठी व्यक्तिगत वाहनं 20 वर्षांनंतर आणि व्यवसायिक वाहनं 15 वर्षांनंतर हटवण्यात येतील, प्रदूषण कंट्रोल करण्यासाठी निर्णय घेतले जातील, यामध्ये ऑटोमेटिड फिटनेट सेंटरही तयार केले जातील, हवा शुद्ध करण्यासाठीही काम केलं जाईल, शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0 साठी 1 लाख 41 हजार कोटी रुपए खर्च केले जातील, येत्या पाच वर्षात दोन हजार कोटी रुपये क्लिन एअरवर खर्च होणार’, असे अर्थमंत्री म्हणाल्या.

११.४२ : तामिळनाडू, केरळ आणि आसाममधील रस्त्यांसाठी मोठी तरतूद
आगामी काळात निवडणुका असलेल्या तामिळनाडू, केरळ आसाममध्ये महामार्गांच्या कामांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

११.४१ : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १ लाख ७८ हजार कोटींचा निधी – अर्थमंत्री

११.३९ : मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी
मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री

११.३८ : रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद
रेल्वेला पायाभूत सुविधांसाठी १.१० लाख कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीची तरतूद – अर्थमंत्री

११.३६ : दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाईप लाईनचा विस्तार
दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाईप लाईनचा विस्तार करणार – अर्थमंत्री

११.३५ : पश्चिम बंगालसाठी मोठी घोषणा
पश्चिम बंगालमधील महामार्गांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

११.३४ : भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी
भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी रुपयांची तरतूद – अर्थमंत्री

११.३४ : कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स
कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स उभारणार. आवश्यक सर्व सुविधांसह येत्या तीन वर्षात सात टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल – अर्थमंत्री

११.३२ : जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटी
जल जीवन मिशन योजनेसाठी २ लाख ८७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे – अर्थमंत्री

११.३० : आणखी दोन लसदेखील लवकरच मिळण्याची शक्यता – अर्थमंत्री
आज भारताकडे दोन कोरोना लस उपलब्ध असून केवळ आपल्याच नाही, तर अनेक देशांतील नागरिकांची कोरोनाविरोधात सुरक्षा केली जात आहे. आणखी दोन लस लवकरच मिळण्याची शक्यता आहे अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

११.२७ : देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब
देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद – अर्थमंत्री

११.२४ : कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद
कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे – अर्थमंत्री

११.२४ : नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद
नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद – अर्थमंत्री

११.१८ : आत्मनिर्भर भारत पॅकेजचा उल्लेख
आत्मनिर्भर भारत पॅकेजेमुळे जो आर्थिक सकारात्मक परिणाम झाला तो २७.१ लाख कोटी रुपयांचा म्हणजे जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त होता – अर्थमंत्री

११.१६ : अर्थमंत्र्यांकडून रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण
निर्मला सीतारमण यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण करून दिली. ‘ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो.’

११.१२ : कोरोना संकटात सरकारने पाच मिनी बजेट सादर केले
कोरोना संकटात सरकारने पाच मिनी बजेट सादर केले, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही २७ लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले – अर्थमंत्री

११.११ : अर्थमंत्र्यांकडून ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना भारताने ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय मिळत कसोटी मालिका जिंकल्याचा दाखला दिला.

११.०५ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून कोरोना संकटातील मदतीची माहिती
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला कोरोना संकटात केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. आत्मनिर्भर पॅकेजचाही त्यांनी उल्लेख केला. कोरोना संकटात सरकारने गरजूंना मदतपुरवठा केला असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button