breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

सोसायटीधारकांसाठी भाजपाचे ‘रेड कार्पेट’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘मायक्रो कॅम्पेनिंग’

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणार

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे, महाविकास आघाडीचे नाना काटे यांना आव्हान

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मायक्रो कॅम्पेनिंग’ सुरू केले. शहरातील सोसायटीधारकांसाठी भाजपाकडून ‘रेड कार्पेट’ तयार केले असून, आगामी काळात सोसायट्यांच्या समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे सोसायटीधाकरकांच्या मतांसाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करणारे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
रावेत, किवळे, वाकड, पुनावळे आदी भागातील सोसायटीधारकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट संवाद साधला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी मंत्री बाळा भेगडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, सर्व स्थानिक पदाधिकारी व माजी नगरसेवक तसेच सर्व गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी, प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणी समजून घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधून प्रत्येक अडीचणी व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे गाऱ्हाणे मांडले. विकास आराखड्यानुसार रस्ते होत नसल्याने वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. बिल्डरांचाही अनेक प्रकारे त्रास सोसायट्यांतील नागरिकांना सहन करावा लागतो. मजल्यावर मजले चढतात पण पाण्याचा प्रश्न काही सुटत नसल्याकडे त्यांनी फडणवीसांचे लक्ष वेधले.

सोसायट्यांच्या प्रतिनिधींकडून सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत तोडगा काढण्यासाठी सोसायटी फेडरेशनसोबत मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. रस्ते, वाहतूक, पाणी, कचरा या सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील जनतेने पहिल्यांदाच भाजपच्या हातात महापालिकेची सत्ता दिल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत विकासाला प्रचंड गती देण्यात आली आहे.

सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी शासन आणि महापालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. काही राहिलेले प्रश्नही सोडवू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भरघोत मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी गृहनिर्माण सोसोयट्यांतील नागरिकांना केले.

महेश लांडगे यांची जोरदार बॅटिंग…

भोसरी विधानसभा मतदार संघामधील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार महेश लांडगे यांची गेल्या काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात काम हाती घेतले आहे. त्यामुळे सोसायटीधारकांशी सुसंवाद आणि समस्या सोडवण्यासाठी मदत होते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी लांडगे यांनी नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. आज झालेल्या सोसायटीधारकांच्या बैठकीत लांडगे यांनी पुढाकार घेत सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्याबाबत आम्ही कटीबद्ध असल्याचे सांगितले. काही प्रश्न सुटलेले नसतील तर ते सुद्धा सोडवण्याची धमक फक्त भाजपमध्येच आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे आम्ही दुर्लक्ष करणार नसल्याचे वचन त्यांनी दिले.

पिंपरी-चिंचवडमधील गृहनिर्माण सोसायट्यांना सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात सोसायटी फेडरेशनसोबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करू. तसेच सर्व रस्ते विकास आराखड्यानुसार करून वाहतूक व्यवस्था सुरळित करण्याचे आणि पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात येणार आहे.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button