Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती

मुंबई: भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे  यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद रिकामं झालं होतं. त्यांच्याजागी आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रशेखर बावनकुळे यांना स्थान मिळालं नाही. मात्र, पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. तसेच, ते भाजपचे आक्रमक नेतृत्व म्हणूनही त्यांची ओळख आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देण्यामागील कारणं काय?

१. भाजपचा ओबीसी चेहरा

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. नागपूर आणि विदर्भात त्यांच्याकडे ओबीसी नेता म्हणून पाहिलं जातं. बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्यावेळी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. गेल्या १० वर्षात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेता विराजमान झालेला नाही. भाजपसाठी ओबीसी समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी नेत्याला बसवून भाजपने ओबीसींना मोठा संदेश दिला आहे.

२. नितीन गडकरी – देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे

विदर्भातील भाजपचे सर्वात महत्त्वाचे दोन नेते म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या दोघांशीही बावनकुळेंचे जवळचे नाते आहे. ते दोघांच्याही मर्जीतले नेते मानले जातात. २०१९ ची विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानंतर त्याचं विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असताना त्याठिकाणी बावनकुळे यांची वर्णी लागली होती.

३. पक्षाशी एकनिष्ठ

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बावनकुळे यांना देवेंद्र फडणवीसांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले नाही. तरीही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करण्याचं काम सुरुच ठेवलं. त्यांनी नेहमी पक्षाचा आदेश सर्वोच्च मानला. पक्ष देईल ती जाबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचाच फायदा त्यांना याठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

४. मंत्रीपद, पालकमंत्रीपद सांभाळल्याने प्रशासनाची जाण

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना चंद्रशेखर बावनकुळे यांना ऊर्जा मंत्रीदप देण्यात आलं होतं. तसेच, त्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यामुळे त्याची प्रशासनावर चांगली पकड आहे. त्याचा ते पक्षवाढीसाठी वापर करु शकतात.

५. पक्ष एकजुटीसाठी, पक्ष वाढीसाठी चंद्रकांत पाटलांच्या तोडीचा नेता

गेल्या अनेक काळापासून ते पक्षासाठी काम करत आहेत. पक्षाची प्रत्येक नस न नस त्यांना माहित आहे. चंद्रकांत पाटलांनंतर पक्षाला सांभाळणं, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश देणं हे बावनकुळे चांगल्या पद्धतीने करु शकतात. तसेच, आगामी काळात येणाऱ्या निवडणुका पाहता त्यासाठी बावनकुळे यांचा अनुभव कामी येऊ शकतो. त्यामुळे पक्ष एकजुटीसाठी आणि ते आपल्या नेतृत्व गुणातून पक्षसंघटनेला आणखी बळकटी देऊ शकतात.

कोण आहेत चंद्रशेखर बावकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रिपदाची धुरा होती. डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी नागपुरातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. ते ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. २६ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button