Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

‘भाजप सत्तेसाठी काहीही करतं, हा लोकांचा दृष्टीकोन मला मुख्यमंत्री केल्याने बदलला’

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडत भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर गटाने सत्ता स्थापन केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असं मानलं जात होतं. मात्र भाजप नेतृत्वाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत फडणवीस यांच्या ऐवजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं. या सर्व घडामोडींविषयी आता स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

भाजप नेतृत्वाचा निर्णय तुमच्यासाठीही धक्कादायक होता का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, ‘भाजप सत्तेसाठी काहीही करते, असा लोकांचा दृष्टीकोन होता. मात्र आम्ही ५० आमदारांनी हिंदुत्वाची आणि विकासाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे.’ एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी असताना शिवसेनेच्याच आमदारांनी केलेलं बंड देशभर चर्चेचा विषय ठरलं. या बंडाबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही भाजपसोबत सरकार बनवून काहीही चुकीचं केलेलं नाही. २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाबद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भूमिका घेता येत नव्हती. तसंच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्यासंबंधीही आम्ही उघडपणे भूमिका घेऊ शकत नव्हतो,’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकशाहीत ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सर्व आम्ही केल्या आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा विजय झाला आहे, बहुमत चाचणीतही आम्ही विजयी झालो. १७० आमदारांचं बहुमत असणारं हे सरकार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button