Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरेतील वृक्षतोडीमुळं वाहतुकीत बदल

मुंबईः शिंदे- फडणवीस सरकारने आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवल्यानंतर आज आरेत झाडांची कत्तल करण्यात येत आहे. आरेत सोमवारी मेट्रो कारशेडच्या कामाला प्रारंभ झाला असून पोलीस संरक्षणात या ठिकाणी झाडे कापली जात आहेत. आरे कॉलनीत झाडे तोडण्याची कामे सुरु असल्याने वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत आहे.

मेट्रो कारशेडच्या कामासाठी आरे कॉलनीत झाडे तोडण्याचे काम आज सकाळीच सुरु करण्यात आले आहे. त्यामुळं आरे ते पवई रस्त्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्यामुळं सकाळीच ऑफिससाठी निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबई पोलिस आणि बेस्ट प्रशासनाने तातडीने वाहतूकील केलेल्या बदलांची माहिती दिली आहे. बेस्टने ट्विट केलं आहे तर मुंबई पोलिसांनी एक नोटिस जारी केली आहे.

आरे कॉलनी येथे झाडे तोडण्याची कामे सुरू केल्यामुळं वाहतूकीसाठी रस्त्या बंद करण्यात आला आहे. त्यामुळं बसमार्ग क्रमांक ४६०, ४८९ हे जेव्हीएलआर मार्गाने मुंबई पवईपर्यंत वळवण्यात आले आहेत. तर, मार्ग ३९८, ३४१, ४७८, ३२६ हे जेव्हीएलआर मार्गाने वळवले आहे. मार्ग ३४२, ४५१, ४५२ हे मार्ग ३४३मध्ये चालवण्यात येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून हे बदल करण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी देखील एक नोटिस काढून वाहतूकीत बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. आरे कॉलनी ते मरोळ नाका आणि आरे कॉलनी ते फिल्टरपाडा येथील वाहतूक वळवण्यात आली आहे. एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळे रात्री १२ पासून पुढील २४ तासांसाठी आरे रोड वाहतुकीकरिता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया पवई/मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा, असं मुंबई पोलिसांनी नमूद केलं आहे.

मार्ग बंद

दिंडोशी वाहतूक विभागांतर्गंत आरे कॉलनीतील रस्त्यांवर वाहतूकीची कोंडी होऊ नये व वाहन चालकांचे, नागरिकांचे सुरक्षिततेसाठी आरे रोडवरील दोन्ही बाजूने होणारी वाहतूक ही बंद करण्यात येत आहे, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

पर्यायी मार्ग

आरे जंक्शनकडून पवई आणि मरोळकडे जाणारे नागरिक आणि वाहन चालकांनी जेव्हीएलआर रोडचा वापर करावा. तसंच, पवई आणि मरोळकडून येणारे वाहन चालकांनी जेव्हीएलआर रोडचा वापर करावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आरे कॉलनीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांकरिता आरे रोड वापरास मुभा आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. दरम्यान, वाहतूकीतील हा बदल तात्पुरता आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button