TOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकला एअरबस प्रकल्प होण्यासाठी भुजबळांचे थेट टाटांना पत्र

प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्यामुळे तरुणांचे मोठे नुकसान झाल्याची भावना

नाशिक ।

वेदांता फॉक्सकॉननंतर आता २२ हजार कोटींचा टाटा-एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. देशाच्या संरक्षण मंत्रालयासाठी एअर बस निर्मितीचे २२ हजार कोटींचे कंत्राट टाटा उद्योग समूहाला मिळाल्याबद्दल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना पत्र पाठवून अभिनंदन केले होते. परंतु हा प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्यामुळे तरुणांचे मोठे नुकसान झाल्याची भावना छगन भुजबळ यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी केलेला एखादा पत्रव्यवहार दाखवावा, असे आव्हान दिले होते. त्यानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रतन टाटा यांना ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पाठवलेले पत्र उघड केले आहे.

छगन भुजबळ यांनी नाशिकमधील एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे येथील तरुणांचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त करीत टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना २०२१ मध्ये पाठवलेले पत्र जाहीर केले आहे. रतन टाटा यांनी एअरबस प्रकल्प नाशिकच्या ओझर येथील एचएएल यांच्याशी जॉइंट व्हेंचरमध्ये करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. तसेच यासाठी एचएएलच्या पायाभूत सुविधा व प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग होईल, असेही पत्रात नमूद केले होते.

ओझर येथील एचएएलशी जॉंइंट व्हेंचर करून हा प्रकल्प उभारल्यास त्यांना हव्या असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याचे आश्‍वासन पत्रात दिले होते. अनेक प्रकल्पांबाबत महाराष्ट्राला डावलले जात असल्याचा आरोप भुजबळांनी केला असून ही बाब चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील तीन महिन्यांमध्ये तीन मोठे प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. परंतु उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाचे खापर मविआ सरकारवर फोडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रकल्प आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस पाऊलं उचलली गेली नाहीत, कोणताही पत्र व्यवहार झाला नाही, असा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.

काय आहे टाटा-एअरबस प्रकल्प?
भारतीय हवाई दलासाठी मालवाहू विमाने तयार करण्यासाठी २२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. सी-२९५ जातीची मालवाहू विमाने उत्पादित करणारा हा प्रकल्प आहे. या विमानातून जवळपास ७० जण प्रवास करू शकतात. तसेच सुसज्ज नसलेल्या धावपट्ट्यांवरूनही त्यांचे उड्डाण-उतरणे शक्य होऊ शकते. टाटांसोबत हा संयुक्त प्रकल्प उभारणारी एअरबस ही स्पेनची कंपनी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button