breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पंढरपुरातील ‘हे’ दृष्य धडकी भरवणारे

पंढरपूर |महाईन्यूज|

अतिवृष्टी आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपुरात भीमेला पूर आला. या पुरामुळे शहर आणि तालुक्यातील तब्बल ३३०५ घरांमध्ये पाणी शिरले असून घरांचे आणि शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारनंतर उजनीतून येणारा विसर्ग कमी झाल्याने पंढरपूरचे पाणी ओसरण्यास रात्री उशिरापासून सुरुवात झाली असून या दोन दिवसात १७ हजारपेक्षा जास्त नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या पूर परिस्थितीत कोल्हापूरच्या वजीर रेस्क्यू फोर्स आणि व्हाइट आर्मीच्या जवानांनी शहर व तालुक्यात अनेक नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढायचे काम केले.

प्रदक्षिणा मार्गावरील नागपूरकर मठाजवळ राहणारे विठ्ठल पोतदार यांचे वार्धक्याने निधन झाले होते. मात्र त्यांच्या घराजवळ तीन फुट पाणी असल्याने त्यांचा मृतदेह वजीर फोर्सच्या जवानांनी बाहेर काढून अंत्यसंस्कारासाठी सुपूर्द केला. संत पेठ येथील एका प्रसूत झालेल्या महिलेला व नवजात बालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले होते. चंद्रभागेवरील नवीन पूल व अहिल्या पुलावर पाच फुटापेक्षा जास्त पाणी असल्याने शहरातून एकाही वाहनाला बाहेर पडता येत नव्हते . यामुळे शहरातील विविध मार्गांवर हजारो ट्रक्स अडकून पडले आहेत. शनिवारी सकाळपर्यंत हळूहळू पाणी कमी झाल्यावर ही वाहने बाहेर पडू शकणार आहेत.

शुक्रवारी शहरातील खिस्ते गल्ली, हरिदास वेस, कालिकादेवी चौक, काळामारुती, आंबेडकर नगर, घोंगडे गल्ली आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. या ठिकाणी रस्त्यावर होड्या फिरताना दिसून आल्या. शहर तालुक्यात तब्बल १६ हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये शहरातील स्थलांतरित नागरीकांना श्री विठ्ठल मंदिर समितीने दोन वेळचे जेवण दिले आहे.

अतिवृष्टीमुळे शहरासह तालुक्यातील ९५ गावे बाधित झाली असून पंढरपूर शहरात ६ तर भंडीशेगांव येथील १ अशा सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्यातील ४४० घरांची पडझड झाली असून ४ बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागासह ४ हजार कुटुंबातील १६ हजार नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. शुकवारी सकाळपासून उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला.

दुपारी ४ वाजता अकलूज जवळील संगम येथे १ लाख ९० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. तर चंद्रभागा नदी येथे २ लाख ८९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होता. तसेच संध्याकाळी पुराचे पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली. उजनीचा विसर्ग कमी होऊ लागल्याने चंद्रभागा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button