TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

विवाह संकेतस्थळावरील कथित वधू-वरांपासून सावधान!

अनेक विवाहोच्छुक तरुण-तरुणी लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर मोठे शुल्क मोजून आपले प्रोफाईल टाकतात. मात्र, याचाच काही महाठग गैरफायदा घेऊन स्वत:ला विवाहोच्छुक असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक करण्यासाठी जाळे टाकतात. अशा दोन घटना नागपुरात उघडकीस आल्या असून दोघांनीही शेकडो तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून लाखोंनी फसविल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न करण्याच्या नावावर महिलांची फसवणूक करणाऱ्या भिकन नामदेव माळी (४२) रा. देविदास कॉलनी, सुभाषनगर, धुळे याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. नागपुरातील एका ३४ वर्षीय पीडितेने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. भिकनला जुगार आणि सट्ट्याचे व्यसन आहे. पैशांसाठी तो विवाह संकेतस्थळावर महिलांशी ओळख वाढवतो. वेगवेगळे कारण सांगून त्यांच्याकडून पैसे घेतो आणि फरार होतो, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

तक्रारीनुसार, जूनमध्ये भिकनने सीताबर्डी परिसरात राहणाऱ्या पीडितेला ‘शादी डॉट कॉम’वरून लग्नाचा प्रस्ताव पाठवला. यावेळी त्याने त्याचे नाव मोहित राजाराम पवार आणि वय ३७ वर्षे सांगितले होते. तसेच तो मुंबईत टाटा मोटर्स कंपनीसाठी काम करीत असून त्याला ७५ हजार रुपये महिना पगार असल्याची थाप मारली होती. चांगले स्थळ आल्याने पीडितेने त्याच्याशी बोलणे सुरू केले. भिकन पीडितेला भेटण्यासाठी नागपूरला आला. त्याने पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अविवाहित असल्याचे सांगून वडील पोलीस विभागातून सेवानिवृत्त अधिकारी असल्याची माहिती दिली. काही दिवसानंतर भिकनने पीडितेला सांगितले की, सामाजिक कार्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता आहे. पीडितेने त्याला २० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर भिकनने तिच्याशी बोलणे बंद केले. मुंबईला परतण्यासाठी पीडितेनेच त्याचे तिकीट काढून दिले होते. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीला आधीच माहिती देण्यात आली होती की, अशी व्यक्ती पुन्हा आली तर माहिती देण्यात यावी. दोन दिवसांपूर्वी भिकनने त्याच ट्रॅव्हल्स कंपनीत तिकीट बूक केल्याची माहिती पीडितेला मिळाली. ती भिकनला जाब विचारण्यासाठी तेथे पोहोचली. यावेळी भिकनसोबत एक तरुणीही दिसली. विचारपूस केली असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने पीडितेने त्याला पकडले.

अनेक महिलांची फसवणूक

भीकनवर सीताबर्डी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. भिकनला जुगार, सट्ट्याचे व्यसन आहे. तो अशाच प्रकारे महिलांची फसवणूक करून पैसे घेतो आणि ते जुगारात उडवतो. तसेच भिकन विवाहित आहे आणि पत्नी व मुलांपासून वेगळा राहतो. आतापर्यंत त्याने १५ महिलांना फसवल्याची माहिती समोर आली.

तरुणींच्या टोळीकडूनही फसवणूक

जरीपटका पोलिसांनी सायबर क्राईमच्या मदतीने लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या तरुणींच्या टोळीला अटक केली होती. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर १५ ते २० तरुणी विवाह संकेतस्थळावरील युवकांना कॉल करून लग्नाबाबत विचारपूस करून सुंदर मुलींचे छायाचित्र पाठवून आर्थिक फसवणूक करीत होत्या. पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आणि केशव वाघ यांनी हे कृत्य उघडकीस आणले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button