breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश, बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण?

मुंबई | भाजपाची सातवी यादी बुधवारी जाहीर झाली. या यादीत भाजपाने नवनीत राणांना अमरावतीतून लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. तसंच त्यांचा भाजपात पक्षप्रवेशही झाला आहे. मात्र, आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, नवनीत राणांना तिकीट दिलं ही भाजपाची मर्जी आहे. उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही. आम्ही आमचं काम करू व्यवस्थित. उमेदवारी देऊन विजय मिळवता येतो का? तसं न झाल्यास चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नवनीत राणांना पाडता येतं का? हे आम्ही पाहणार आहोत. चांगला उमेदवार जो जिंकून येऊ शकतो अशा उमेदवाराचा शोध आम्हाला आहे.

सक्षम उमेदवार असेल तर त्याला पाठिंबा देणार किंवा नवा उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. भाजपाचे झेंडे ज्यांनी हाती घेतले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा लोकांचा विचार करणं हे भाजपात संपलं आहे. रवी राणाने भाजपाचं कार्यालय फोडलं होतं. भाजपाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती. आता काय वेळ आली पाहा. एवढी लाचारी कुणावर येऊ नये. याच रवी राणाचा जयजयकार कार्यकर्त्यांना करावा लागत असेल तर स्वाभिमान गेला आणि अभिमानही गेला, असं बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा    –    ‘मनसेकडून महायुतीकडे ३ जागांची मागणी’; मनसे नेते बाळा नांदगवकर यांचं वक्तव्य

अमरावतीतलं चित्र हे अमरावतीकरांच्या मनातलं असेल. जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र झालं पाहिजे. आपल्यापेक्षा ज्याला पाडायचं आहे ते लक्ष्य मनात ठेवलं पाहिजे. कोणता उमेदवार निवडून येतो त्यापेक्षा नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य असलं पाहिजे. रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता पाहू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात दम आहे. स्वाभिमान पक्ष विकून भाजपाच्या दावणीला आम्ही बांधला नाही. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळेच आम्ही बरोबर आहोत. आमच्या मतदारसंघात खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार आहे हे दाखवून देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.

भाजपा कार्यकर्त्यांनी किती लाचारी पत्करायची, काय करायचं? तो आमचा प्रश्न नाही. भाजपा कार्यकर्त्यांना मी विनंती करतो आहे की त्यांनी नवनीत राणांना पाडावं. ४०० पार होणारच आहे भाजपा. एखादा खासदार पडला तर काही फरक पडत नाही. जातीच्या बाबतीत खोटी कागदपत्रं देऊन गुन्हा केला आहे. अशा लोकांना उमेदवारांना उमेदवारी देऊन हम करे सो कायदा हे चित्र भाजपाने दाखवलं आहे. आम्हाला अभिमान, स्वाभिमानाचा गुलाल उधळायचा आहे, असंही बच्चू कडू म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button