ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

बाबासाहेबांचा जिवंतपणी पुतळा उभारला, फुले शाहू विचारांसाठी लढा, माधवराव बागल यांच्या 5 खास गोष्टी

कोल्हापूर | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे भारतात अनेक शहरांमध्ये पुतळे पाहायला मिळतात. पण, कोल्हापूरमधील बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं एक वेगळेपण आहे. कारण, बाबासाहेब आंबेडकर हयात असताना उभारण्यात आलेला पहिला पुतळा आहे. कोल्हापूरच्या जनतेच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या दोन महामानवांच्या पुतळ्यांची उभारणी करण्यासाठी झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे भाई माधवराव बागल होय.

राजर्षी शाहू महाराजांकडून शिष्यवृत्ती

भाई माधवराव बागल यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे वडील खंडेराव बागल कोल्हापूर संस्थानात अधिकारी होते. कोल्हापूरमधील निसर्गसौंदर्य संपन्न असलेल्या वातावरणात त्यांचं लहानपण गेलं होतं. माधवराव बागल ९ ते १० वर्षांचे असताना ते पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांना भेटले. खंडेराव बागल यांनी शाहू महाराजांना नमस्कार केला. पुढं महाराजांनी हा तुमचा मुलगा आहे का? असं विचारत माधवरावांची विचारपूस केली होती .
माधवराव बागल यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मुंबईला जे.जे. आर्ट. स्कूलला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. त्या प्रसंगाबद्दल भाई माधवराव बागल यांनी एक आठवण लिहून ठेवलीय. शाहू महाराजांनी भेटी दरम्यान पेंडसे दिवाणजींना सांगून माधवरावांसाठी स्कॉलरशिप सुरु केली आणि मुंबईतील बंगल्यात राहण्याची रहायला जागा दिली होती.

 

कोल्हापूरमधील बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा

महात्मा गांधींच्या भेटीनं कलाटणी

मुंबईतील आर्ट स्कूलचं शिक्षण करुन परत आलेले माधवराव बागल वडिलांच्या हंटर पत्रासाठी मदतीचं काम करत होते. मोकळ्या वेळेत ते कोल्हापूरमध्ये फिरुन चित्र काढत असतं. महात्मा गांधींनी कोल्हापूरला भेट दिली त्यावेळी त्यांना सत्यशोधक समाजातर्फे मानपत्र देण्यात आलं होतं. खंडेराव बागल यांचा त्यामध्ये पुढाकार होता. त्या कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधींनी माधवरावांना “चित्रकार आहात तर चित्रे अशी काढा की त्यामुळे जनसेवा घडेल”, असा सल्ला दिल्ला. महात्मा गांधींच्या या सल्ल्यानं माधवरावांचं जीवन बदलून गेलं.

माधवराव बागल यांनी कोल्हापूरमध्ये प्रजा परिषदेची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी काढला होता.पुढे जनतेच्या प्रश्नावर लढल्यानं त्यांना अनेक वर्ष तुरुगंवास भोगावा लागला. माधवराव बागल राजकारणी, क्रांतिकारक समाजकारणी, प्रतिभावान साहित्यिक, चित्रकार आणि शिल्पकार देखील होते.

 

भाई माधवराव बागल आणि यशवंतराव चव्हाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा उभारला

भाई माधवराव बागल हे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावले होते. दोन्ही महामानवांच्या विचारांची स्फूर्ती करवीर नगरीतील युवकांना मिळावी, असं वाटत असल्यानं माधवराव बागल यांनी कोल्हापूरमधील बिंदू चौकात पुतळे उभारणीचा निर्णय घेतला. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रॉंझचे पुतळे तयार करुन ९ डिसेंबर १९५० रोजी हजारो कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत त्याचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी भाईंनी उपस्थितांसमोर भाषण केलं.या सोहळ्याचं वेगळेपण म्हणजे बिंदू चौकात त्यावेळी जमलेल्या जनसमुदायातील दोन सामान्य माणसांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. माजी आमदार बाबुराव धारवाडे यांनी ही आठवण लिहून ठेवली आह

संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या पंचकांपैकी एक

भाई माधवराव बागल यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील स्वत:ला झोकून दिलं होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते नेते होते. तर, सीमा आंदोलनाचे सेनापती होते. त्यावेळी माधवराव बागल यशवंतराव चव्हाण यांची देखील गय करत नसत. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर माधवराव बागल यांनी काँग्रेसच्या विचारांना प्राधान्य दिलं. त्यापूर्वी ते शेकापमध्ये काम करत होते.

 

बाळासाहेब देसाई आणि भाई माधवराव बागल

सच्चे सत्यशोधक

भाई माधवराव बागल हे सच्चे सत्यशोधक होते. १९७३ च्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात माधवराव बागल यांनी बाळासाहेब देसाई आणि अ‍ॅड. रामराव आदिक यांना खडे बोल सुनावले होते. माधवराव बागल यांच्या नातीचं लग्न होतं. लग्नपत्रिका पारंपारिक पद्धतीनं छापण्यात आल्या होता. त्यातील देवतांच्या नावाच्या उल्लेखावरुन ते संतापले होते. लग्नपत्रिकेतून देवांची नावं काढा किंवा माझं नाव तरी काढा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. ही आठवण बाबुराव धारवाडे यांनी लिहून ठेवली आहे.

महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात,संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या, राजर्षी शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या भाई माधवराव बागल यांचं ६ मार्च १९८६ रोजी निधन झालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button