TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

‘हायड्रोजन’वर धावणारी स्वयंचलित ‘सोनिक कार’ची निर्मिती वणीत

यवतमाळ : ‘केवळ स्वप्न बघून ध्येय गाठता येत नाही तर, ठरवलेले ध्येय प्रत्यक्षात साकार होण्यासाठी परिश्रम करावे लागतात’, याचा परिपाठ वणीतील हर्षल व कुणाल दोन उच्चशिक्षित तरुणांनी घालून दिला आहे. केवळ १५० रुपयांच्या हायड्रोजमध्ये तब्बल २५० ते ३०० किमी धावणारी स्वयंचलित ‘सोनिक कार’ तयार करून या दोघांनी ‘आटोमोबाईल इंडस्ट्री’त खळबळ उडवून दिली आहे.

सर्व सुटे भाग स्वतः तयार करून तर काही सुटे भाग बाहेरून मागवून ही अत्यंत देखणी अशी सुपर कार पूर्णपणे वणीत तयार झाली आहे. ही कार बघायला अनेकांची गर्दी होत आहे. कल्पकतेने ही किमया साध्य करणारा शेतकरीपुत्र हर्षल महादेव नक्षणे व त्याला या कारचे स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्यासाठी मदत करणारा कुणाल आसुटकर या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे कार वापरण्यावर मर्यादाही येत आहे. शिवाय धुरामुळे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून हर्षल नक्षणे याने आपला मित्र कुणाल आसुटकर याच्या मदतीने अफलातून अशी प्रदुषणमुक्त स्वयंचलित ‘सोनिक कार’ तयार केली आहे.

हर्षलचे शालेय शिक्षण वणीतील एसपीएम शाळेत झाले. त्यानंतर त्याने बालाजी पॉलिटेक्निक, सावा येथून शिक्षण पूर्ण केले. २०२१ मध्ये त्याने पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमधून एम.टेक.ची पदवी मिळविली. भारताकडे शून्य प्रदूषणाचे मानक पूर्ण करणारी आणि कमी इंधनात अधिक धावणारी स्वत:ची सुपरकार असली पाहिजे, या ध्यासातून ही कार तयार केल्याचे हर्षलने सांगितले. या कारसाठी ‘ग्रीन हायड्रोजन’ ऊर्जा वापरणे आणि अपघात व मानवी चुका टाळता येईल, हे उद्दिष्ट कार बनवताना ठेवले होते, असे तो म्हणाला.

या कारच्या निर्मितीसाठी ‘aicars.in’ या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. हर्षलला कुणाल आसुटकर या विज्ञान शाखेत शिकणाऱ्या त्याच्या बालपणीच्या मित्राने कार निर्मितीत मोलाची मदत केली. काही दिवसांपूर्वीच ही कार तयार झाली असून तिची ‘हायड्रोजन गॅस’वर यशस्वी चाचणी पार पडली आहे. ‘सेल्फ ड्रायव्हिंग’साठी कारमध्ये संगणक प्रणाली असून ही प्रणाली कारचे संचालन करते. ही कार संपूर्णपणे प्रदूषणमुक्त असल्याचे हर्षलने सांगितले. ही कार तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च आला असून हा खर्च आपल्या इंटरनेट सेवा पुरविण्याच्या व्यवसायातून केल्याचे हर्षलने सांगितले.

कारसाठी लागणारे सर्व सुटे भाग वणीतच तयार केले आहे. फक्त विंडशिल्ड व टायर हे साहित्य अहमदाबाद येथून खरेदी करण्यात आल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे कार धावण्यासाठी आवश्यक असलेले हायड्रोजन लिक्विड इंधन हर्षलने स्वतः तयार केले.’सेल्फ ड्रायव्हिंग व हायड्रोजन फ्युल सिस्टम’साठी पेटंट नोंदणी केली आहे. हर्षलने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना ही कार दाखवली. त्यांनीही कार निर्मितीसाठी उत्पादनाच्या दृष्टीने सर्व मदत करण्याची ग्वाही दिल्याचे हर्षलने सांगितले. १०० कार तयार झाल्यानंतर ही कार १५ ते २० लाख रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती हर्षलने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button