breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

‘..म्हणून आढळरावांना जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय’; अतुल बेनकेंनी सांगितली खरी हकीकत

पुणे | गेल्या पाच वर्षात मतदारसंघात फिरकलेच नसल्याने ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडेच शिरोली फाट्याजवळ खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात पोस्टर लावत गावकऱ्यांनी काही प्रश्नांची सरबत्ती केली होती. तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मागच्या निवडणुकीत पराभव होऊनही जोमाने काम करतांना दिसत आहे. यावरून अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर टिका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आढळरावांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी जोरदार सुरूवात केलीय. राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार अतुल बेनके देखील दररोज गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. यातच त्यांनी कोल्हे यांच्यावर टिका करत आढळरावांचं कौतुक केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांत कोरोना काळ वगळता मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत, याउलट शिवाजीराव आढळराव कोरोना काळ आणि त्यानंतर देखील पायाला भिंगरी बांधल्यागत संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी फिरत राहिले आणि म्हणूनच आज शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले.

हेही वाचा    –    ‘पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणासाठी महायुती सरकारने निधी दिला’; खासदार बारणे 

नरेंद्र मोदी यांनी संसदेत कौतुक केल्यानंतर तुम्ही किती दिवस त्यांच्या पदराखाली लपणार? भाजप प्रवेशाच्या वेळी कितीवेळा तुम्ही अमित शाह यांच्या भोवती पिंगा घातला. हे सर्वांना माहिती आहे. एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात किती टक्के उपस्थितीत होती. ते आपण स्वतलाच विचारा. ज्या ज्या गावात तुम्ही भाषणं केली आहेत. याआधी तुम्ही कधीच त्याठिकाणी आले नाही. त्याठिकाणी तुमचा शुन्य रूपयाचा निधी आहे. त्यामुळेच  विकास काम तर करायची नाही, मात्र इतर गोष्टींच्या गप्पा हाणायच्या. याला आता लोकं भुलणार नाहीत. तुम्ही लोकांना बराच वेळा भुलवण्याचं काम केलं आहे. त्यांना फक्त काम पाहिजे. त्यामुळेच आता शिवाजीराव आढळराव पाटील घड्याळ चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असाही हल्लाबोल त्यांनी केलाय.

दरम्यान, आढळरावांचा प्रचार करतांना अतुल बेनके यांना आलेला एक अनुभव त्यांनी कथन केला आहे. ते म्हणाले की, अजितदादा पवार यांचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे अनेक चाहते राज्यभर भेटतात. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यान असेच अजितदादांवर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्त्व भेटले.

बोरी बु. गावचे बाळासाहेब जाधव यांची आज भेट झाली, त्यांनी अजितदादांचे अनेक अनुभव सांगत त्यांच्या विकासाच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अतोनात आदर आहेच. परंतु भविष्यात महाराष्ट्र राज्याला गतीने पुढे नेण्याची क्षमता फक्त अजितदादांमध्ये आहे तेच सक्षमपणे नेतृत्व करू शकतात असे जनसामान्यांचे मत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जाधव यांनी यावेळी माननीय अजितदादांशी केलेले जुने पत्र व्यवहार, फोटोंच्या स्वरूपातील आठवणींना उजाळा दिला तसेच जाधव यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचंही बेनके यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button