breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

समृद्धी महामार्गाचे काम ७५ टक्के पूर्ण; सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन

मुंबई |

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे आतापर्यंत एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतुकीस खुला होईल होणे अपेक्षित होते. मात्र आता हा टप्पा नव्या वर्षांत सेवेत येईल. तर संपूर्ण प्रकल्पाचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केले आहे. मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासांत पार करण्यासाठी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन होते. मात्र करोना आणि इतर कारणांमुळे प्रकल्पास विलंब झाला. आता एमएसआरडीसीने कामाला वेग दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी ८८६१.०२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यापोटी मोबदला म्हणून ७४२४.३७ कोटी रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रकल्पातील सर्व टप्प्यांतील सविस्तर आराखडय़ाला पर्यावरणविषयक आणि वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. टप्पा २ आणि ५ मधील आराखडय़ास वन्यजीव संरक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सध्या सर्व टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत.

या प्रकल्पात वन्य जीव संरक्षणावरही भर देण्यात आला आहे. त्यानुसार वन्य जीवांसाठी तीन भुयारी तर ३ उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. यापैकी तीनही भुयारी मार्ग पूर्ण झाले असून एका उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, तर दोन उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. वाहनांसाठी बांधण्यात येत असलेल्या ६५ उन्नत मार्गापैकी १३ मार्ग पूर्ण झाले असून ५२ मार्गाचे काम सुरू आहे. तर वाहनांसाठीच्या १८९ भुयारी मार्गापैकी १६३ मार्ग पूर्ण झाले असून २६ मार्गाचे काम सुरू आहे. यासह अन्य कामेही प्रगतीपथावर आहेत.

  • प्रकल्पातील कामांची सद्यस्थिती

’ ५५,३३५.३२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात एकूण १,६९९ प्रकारची बांधकामे करण्यात येत आहेत.

’ ७०१ किमीच्या मार्गात तब्बल ६५ उड्डाणपूल बांधण्यात येणार असून आतापर्यंत यातील २४ उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले आहे. तर ४१ उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर आहे.

’ प्रकल्पात ३२ मोठय़ा, तर २७४ छोटय़ा पुलांचाही समावेश आहे. १९ छोटे, तर २२६ मोठे पूल पूर्ण झाले असून १३ छोटय़ा आणि ४८ मोठय़ा पुलाचे काम वेगात सुरू आहे.

’ आठ रेल ओव्हर पुलांच्या कामांपैकी चार पुलाचे काम झाले असून ४ पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.

’ महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पात एकूण सहा बोगदे समाविष्ट असून या सहाही बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

’ १० जिल्ह्यांना, २६ तालुक्यांना आणि ३९२ गावांना जोडणाऱ्या या महामार्गाचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रकल्पात एकूण २४ इंटरचेंजेस अर्थात प्रवेशद्वारे देण्यात आली आहेत. या २४ पैकी १६ प्रवेशद्वारांची काम सुरू असून आठ प्रवेशद्वाराची कामे पूर्ण झाली आहेत.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे एकूण ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. कामाचा वेग सध्या वाढविण्यात आला आहे. पण पहिला टप्पा वा संपूर्ण मार्ग कधी सेवेत येईल यावर आता भाष्य करता येणार नाही.

– राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button