breaking-newsTOP Newsमुंबईराजकारणराष्ट्रिय

संजय राऊतांचं मोदी सरकारवर टीकास्र! संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. नवीन ताकद मिळाल्याची भावना ठाकरे गटाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज ‘सामना’तील रोखठोक या सदरामध्ये मोदी सरकारवर परखड भाषेत टीकास्र सोडलं आहे. तसेच, यासाठी त्यांनी जर्मन हुकुमशाह हिटलरच्या काळातील एक उदाहरणही दिलं आहे.

‘गडकरी जे म्हणाले ती जनभावना…’
संजय राऊतांनी नितीन गडकरींच्या एका विधानाचा लेखात उल्लेख केला असून त्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “तुरुंगात असताना नितीन गडकरी यांचे एक भाषण वाचनात आले. त्यांनी परखडपणे सांगितले की, ‘राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर मला आजवर अनेक माणसे भेटली. यात खूप मोठी वाटणारी माणसे खुजी निघाली तर प्रत्यक्षात जी माणसे मला छोटी वाटायची ती प्रत्यक्षात उत्तुंग निघाली. दिल्लीचे पाणी चांगले नाही. गडकरी यांनी जे म्हटले ती आज जनभावना का बनली, याचे उत्तर दिल्लीच्या आजच्या वतनदारांनी शोधायला हवे. पण आजच्या वतनदारांना त्यांच्या मनासारखे उत्तर हवे असते. ते देणार नाहीत ते शत्रू ठरतात’, अशा शब्दांत केंद्र सरकारचा ‘दिल्लीचे वतनदार’ म्हणून उल्लेख करत राऊतांनी टीका केली आहे.

‘पाकिस्तान, चीन हे दिल्लीचे शत्रू नाहीत. परखड बोलणारे, सत्य बोलणारे ज्यांना आपले शत्रू वाटतात त्या राज्यकर्त्यांनी आपला देशही खुजा केलेला असतो. अशा खुज्या नेतृत्वास लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मोल काय समजणार?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

‘जर्मन पुढाऱ्याचे ते विचार हिंदुस्थानसाठी मार्गदर्शक’
‘मार्च १९३३ मध्ये राइशस्टागच्या सभेत सोशल डेमोक्रॅट पक्षाचा नेता ऑटो वेल्स याने हिटलरच्या तोंडावर पुढील उद्गार काढले होते.. “तुमच्या हातात सत्ता आली आहे ही वस्तुस्थिती आम्हाला प्रत्यक्ष दिसत आहे, पण लोकांची न्यायाची ओढ व जाणीव हीसुद्धा एक राजकीय शक्ती आहे. कोणताही कायदा तुम्हाला जनतेचे विचार व विचारस्वातंत्र्य नष्ट करण्याची शक्ती देऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवा!” जर्मन पुढाऱ्याचे हे उद्गार आजच्या हिंदुस्थानसाठी मार्गदर्शक आहेत’, अशी तुलना संजय राऊतांनी केली आहे.

‘राजकारण विषारी बनले आहे…’
‘महाराष्ट्राचे राजकीय वातावरण किती गढूळ झाले आहे व अनेक लोक एकमेकांना कायमचे संपवायला निघाले आहेत, हे ९ नोव्हेंबर रोजी तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवले. आर्थर रोड तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर एक लहानसा स्मृतिस्तंभ उभा केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकांचे आर्थर रोड तुरुंगात वास्तव्य होते. त्या स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी हा स्तंभ उभा केला, पण लोकशाही आणि स्वातंत्र्याचा आता लवलेशही उरलेला नाही. राजकारण विषारी बनले आहे, तितके ते ब्रिटिश काळातही नव्हते. लोकशाही व संसदेचे फक्त नाव घेतले जाते. प्रत्यक्षात या दोन्ही संस्थांचे महत्त्वच नष्ट झाले”, असं राऊत या लेखात म्हणाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button