Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने बोलणी आणि पर्यायाने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं मानलं जात

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा शपथविधी होऊन महिना उलटत आला. मात्र अद्याप शिंदे फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार  झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने बोलणी आणि पर्यायाने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं मानलं जात आहे. मात्र नुकतंच भाजपचे संकटमोचक नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अमित शाहांची दिल्लीत भेट घेतल्याचं समोर आलं आहे. जर शाहांना आपल्याच पक्षाचे नेते महाजनांची भेट घेण्यास वेळ आहे, तर सोबत युती करणाऱ्या एकनाथ शिंदेंची, किंबहुना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास वेळ का नाही? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण अचानक त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. अमित शाह यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र व्यस्त कार्यक्रमात अचानक गिरीश महाजनांना भेटण्यास शाहांना वेळ मिळाला, मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी कॅबिनेट विस्तारावर चर्चा करण्यास शाहांना का वेळ नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाह-महाजन भेटीचं प्रयोजन काय?

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. विविध विषयांवर मुख्यतः नाशिक व जळगाव जिल्ह्यातील विषयांवर चर्चा केली” अशी माहिती खुद्द गिरीश महाजन यांनी दिली. शाहांसोबत भेटीचा फोटो ट्वीट करत महाजनांनी चर्चेचा तपशील सांगितला. अमित शाह यांच्याकडे सहकार खाते आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ राज्य सरकारने बरखास्त केलं. तिथे भाजपचे आमदार आणि गिरीश महाजन यांचे समर्थक मंगेश चव्हाण यांना प्रशासक मंडळाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. याबाबत गिरीश महाजनांनी शाहांना माहिती दिल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

अमित शाह यांच्या संमतीशिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणं शक्य नाही. मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून महिन्याभरात सहाव्यांदा दिल्ली दौऱ्यावर निघाले असताना शाहांनी वेळ का दिली नाही, याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, गिरीश महाजन यांच्यामार्फत संभाव्य नावांची यादी शाहांना सोपवली गेल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांशी भेट टाळत ‘व्हाया गिरीश महाजन’ फडणवीस-शिंदेंनी फायनल नावं पाठवल्याचाही तर्क लढवला जात आहे. शाहांचा कोणता निरोप संकटमोचक महाजन आणतात, याकडे भाजप आणि शिंदे गटाचंही लक्ष लागलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button