Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

तीन महिन्यांत मुंबईच्या रस्त्यांवरील १८ हजार खड्डे बुजवले, BMC चा दावा

मुंबई : जोरदार पावसाने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने महापालिकेला नागरिकांच्या प्रचंड रोषाला तोंड द्यावे लागत आहे. म्हणूनच मुंबई महापालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले आहे. सध्या पालिकेकडून कोल्डमिक्सच्या साह्याने खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याआधारे सुमारे १८ हजार खड्डे बुजविण्यात आल्याचे मुंबई पालिकेकडून सांगितले जात आहे. तरीही, अजूनही खड्डे समस्या पूर्णत: संपुष्टात आलेली नसल्याने मुंबईकरांना खड्डे आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामांची गती वाढवली आहे. त्यातून २५ जुलैपर्यंत सुमारे १८ हजार खड्डे बुजविण्याचा दावा पालिकेने केला असून त्यात कोल्डमिक्स वापराने १५ हजार ५८८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. त्यासह, कंत्राटदारांमार्फत १,१५४ आणि पालिकेच्या केंद्रीय संस्थेमार्फत १,२६६ इतके खड्डे बुजविण्यात आले आहेत. मुंबई पालिकेमार्फत खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जात आहे. इतर ठिकाणचे खड्डेही बुजविण्याचे काम सुरू असल्याचे पालिकेमार्फत सांगण्यात आले आहे.

मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई, खड्ड्यांच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यंदाच्या जुलैमधील पर्जन्यवृष्टीत अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे आढळून आले. त्यावर मुंबईकरांसह राजकीय पक्षांनीही वारंवार टीकेची झोड उडविली आहे.

मालाडमध्ये सर्वाधिक खड्डे

सर्वाधिक खड्डे मालाड (पी-उत्तर) येथील सर्वात जास्त म्हणजे १,२९४ खड्डे बुजवण्यात आले. तर गोरेगाव (पी-दक्षिण) मध्ये १,०८८ खड्डे, अंधेरीत १,१९९ बुजविण्यात आले.

मुंबईकरांना चांगले रस्ते द्या

मुंबई पालिका रस्त्यांवर कित्येक कोटी रुपये खर्च करत असताना खड्ड्यांची समस्या का निर्माण होते, याची उत्तरे मिळाली पाहिजेत. खड्डे बुजविण्याची कामे होत असताना तिथे नव्याने खड्डे होऊ नयेत, याची ग्वाही द्यायला हवी. प्रत्यक्षात, दरवर्षी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते, त्यावर पालिकेने उपाय शोधावेत. पालिकेने नवीन तंत्रज्ञान वापरताना कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा केलेला बोलबाला विसरू नये, अशी टीका मुंबई पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.

खड्डेमुक्त रस्ते हवेत

मुंबईत रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांची समस्या मिटताना दिसत नाही. रस्त्यांवर एवढा निधी खर्च होताना पुन:पुन्हा खड्डे का पडताना दिसतात? मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देण्यात पालिका अपयशी ठरत आहे. चांगले रस्ते देण्यामागे तंत्रज्ञान, निर्णय, धोरण अशा नेमक्या गोष्टीत कमतरता आहे, हे पाहिले पाहिजे. पालिकेने वरवरची मलमपट्टी न करता खड्डेमुक्त रस्ते द्यावेत, अशी मागणी मुंबई पालिकेतील भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

विभागवार आकडेवारी

मालाड- १२९४

गोरेगाव- १०८८

अंधेरी- ११९९

गोवंडी – ८६०

भांडुप- ७८०

चेंबूर- ५८४

बोरिवली – ४०६

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button