Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती

मुंबई : शिंदे गटातील शिवसेना आमदार अब्दुल सत्तार सध्या दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. शिंदे फडणवीस यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ यादीतून सत्तार यांचं नाव वगळल्याची चर्चा आहे. याची कुणकुण लागल्यामुळेच अब्दुल सत्तार धावत दिल्लीला गेल्याचं बोललं जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या  पाठीशी आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होऊन महिना उलटत आला. मात्र अद्याप शिंदे फडणवीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याने बोलणी आणि पर्यायाने मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं बोललं जात आहे.

शिंदे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागणार, याची रोज नवी यादी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. कधी ‘गुजरात पॅटर्न’प्रमाणे माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या चर्चा रंगतात, तर कधी कॅबिनेट मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळणार असल्याचं बोललं जातं. ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तारांकडे राज्यमंत्रिपद होतं. त्यामुळे धास्तीतून सत्तारांनी दिल्ली गाठल्याची चर्चा आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात सत्तारांना कॅबिनेट मंत्रिपदाची आशा असल्याचं बोललं जातं. सत्तार शिंदे गटाचे आमदार आहेत. शिंदे गटाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रिपदं येणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र इच्छुकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये बढती सोडा, आहे ते राज्यमंत्रिपद तरी टिकणार का, याची धाकधूक सत्तारांना असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दिल्ली गाठून थेट भाजपश्रेष्ठींकडे त्यांनी लॉबिंग सुरु केल्याचं म्हटलं जातंय.

आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंत्रिपदाच्या आशेने आलो नाही, असं सत्तारांसह अनेक बंडखोर नेते वारंवार सांगत आले आहेत. मात्र जेव्हा मंत्रिपदाचा प्रश्न येतो, तेव्हा हे मुखवटे गळून पडतात. सत्तार खरंच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात आले का, असाही सवाल विचारला जात होता.

दिल्लीला जाण्यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली अंतिम टप्प्यात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३ ऑगस्टपूर्वी संपन्न होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. कोणते जिल्हे ते (भाजप) घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळणार. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती मंत्री मंत्री होणार?, याबाबत चर्चा केली जात आहे. मला असं वाटत पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि ३ तारखेच्या आत शपथविधी होईल, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button