TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रियलेख

महाविकास आघाडीत आनंदाचे डोही, आनंद तरंग…

  • विशेष लेख: नितीन सावंत

विधानपरिषद निवडणुकांच्या निकालावरून महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण आहे.रायगड शिक्षक वगळता नागपूर शिक्षक,औरंगाबाद शिक्षक आणि अमरावती पदवीधर महाविकास आघाडीच्या ताब्यात आले आहेत.नाशिक पदवीधर मतदार संघ अपेक्षेप्रमाणे तांबे आणि थोरात कुटुंबियांच्या ताब्यात राहिला आहे.या निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी अधिक मजबूत असल्याचा दावा आता या आघाडीचे नेते करतील पण अजून दिल्ली बहोत दूर हैं,असे वातावरण आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती काळ एकत्र राहणार यावर पुढील यश अवलंबून आहे.या निवडणुकीत मात्र आघाडी नेटाने लढली,याचा प्रत्यय अमरावती च्या विजयावरून दिसून आले.

रायगड शिक्षक मतदार संघाची जागा भाजपने शेतकरी कामगार पक्षाकडून खेचून आणली.शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा दारुण पराभव झाला.येथे भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले.म्हात्रे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेमधून भाजप मध्ये प्रवेश केला.म्हात्रे यांना भाजपच्या तिकिटावर विजयाची खात्री होती.त्यामुळेच त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.शिंदे सेनेला ही जागा भाजप सोडण्यास तयार होती पण शिंदे सेनेतून विजयाची खात्री नसल्याने म्हात्रे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.शेकापचे सर्वेसर्वा जयंत भाई पाटील यांची अरेरावी या निवडणुकीत पक्षाला भारी पडली,असे शिक्षक मतदार सांगतात.

औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळे यांचा विजय हा महाविकास आघाडीमुळे सुकर झाला,असे येथील शिक्षकांचे म्हणणे आहे.विक्रम काळे यांच्या डोक्यात फारच हवा गेली होती.शिक्षकांना वागणूक ही व्यवस्थित देत नसत.त्यांच्या विरोधात तक्रारी ही पक्ष श्रेष्ठींना गेल्या होत्या.पण ऐनवेळी अजित दादांनी त्यांच्या पारड्यात वजन टाकले.शिक्षक विधानपरिषदेतील कामगिरी बघत नाहीत.आपला प्रतिनिधी आपल्याशी कसा वागतो याकडे त्यांचे लक्ष असते.भाजपने ही आपला उमेदवार काँग्रेस कडून आयात केला होता.काँग्रेसच्या नेत्या रजनीताई पाटील यांचे समर्थक असलेले किरण पाटील यांच्या दोन चार शिक्षण संस्था आहेत.निवडणुकीच्या सात आठ महिने अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नागपूर सुधार न्यास चा प्रश्न उपस्थित करणारे ना.गो. गाणार यांनाही यावेळी नागपूरच्या शिक्षकांनी घरी पाठवले आहे.विदर्भ शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले या नवख्या उमेदवाराला महा विकास आघाडीने पुरस्कृत केले होते.त्यांनी ना.गो. ना धूळ चारली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळी समर्थक असलेले डॉ.रणजित पाटील यांनाही पराभवाची नामुष्की पत्करावी लागली.मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी रणजित पाटील यांना गृह आणि नगरविकास ही दोन्ही महत्वाची खाती देऊन विश्वास टाकला होता.पण सत्ता गेल्यानंतर त्यांनी फडणवीस यांना सोडून नितीन गडकरींशी संधान बांधले होते.त्यामुळे फडणवीस यांनीही अमरावती कडे फारसे लक्ष दिले नाही.काँग्रेसच्या धीरज लिंगाडे या नवख्या उमेदवाराने अटीतटीच्या लढतीत रणजित पाटील यांचा पराभव केला.

आंतरराष्ट्रीय भाचे अशी ज्याची ख्याती आहे ते सत्यजित तांबे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले आहेत.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमां समोर मौन बाळगून आपले भाचे सत्यजित यांना निवडून आणले.डॉ.सुधीर तांबे अतिशय सोज्वळ आणि सालस अशी त्यांची प्रतिमा आहे.डॉ. तांबे यांना विधानपरिषद सभागृहात किंवा सभागृहाबाहेर चिडलेले कुणी पाहिले असेल अशी एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही.पण सत्यजित तांबे अगदी त्यांच्या उलट आहेत.परंतु काँग्रेस ने दिलेले तिकीट नाकारुन डॉ.तांबे यांनी आपला मुलगा सत्यजित यांना का उभे केले याचे कोडे कुणाला उलगडलेले नाही.

मामा बाळासाहेब थोरात आणि भाचे यांच्यात एक साम्य आहे.1985 साली बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदार संघातून काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर ते अपक्ष निवडून आले आणि सत्यजित ही पहिल्यांदा अपक्ष निवडून आले आहेत.त्यासाठी मात्र त्याचे वडील डॉ.सुधीर तांबे यांना फार मोठा त्याग आणि मनस्ताप सहन करावा लागला.या विजयानंतर थेट दिल्लीत जाऊन सत्यजित काँग्रेस मध्ये सन्मानाने परततील,असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button