breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘संभाजी महाराजांकडून शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रेरणा’; डॉ. अमोल कोल्हे

अजितदादा यांच्यामुळेच खासदार होऊ शकलो

पिंपरी : जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिकवले. तर, शेवटच्या श्वासापर्यंत लढावे कसे, हे छत्रपती संभाजी महाराज यांनी शिकवले. प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे लढण्याची प्रेरणा संभाजी महाराजांकडून घ्यावी, असे प्रतिपादन शिरूर लोकसभेचे खासदार व प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवडला केले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिलखुलास गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवप्रेमी ब. हि. चिंचवडे. श्रमिक गोजमगुंडे, संजय पाचपुते, प्रद्योत पेंढारकर, दिनेश ठोंबरे, आयुष तापकीर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले यांनी घेतलेल्या मुलाखतीत डॉ. कोल्हे यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
पिंपरीतील एच. एच. कंपनीच्या मैदानावर ११ ते १६ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. याचे औचित्य साधून प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले की, स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने संभाजी महाराजांचे चित्र रेखाटले जाते. जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा आहे, ज्याच्या बलिदानानंतर रयतेने तब्बल १८ वर्षे निकराने लढा दिला. काबूल ते बंगालपर्यंत साम्राज्य असलेल्या शहेनशहा औरंगजेबची कबर खोदली. संभाजी महाराजांच्या इतिहासाचे सार शिवपुत्र संभाजी या महानाट्य द्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

कोल्हे म्हणाले की, पुढची लोकसभा निवडणूक लढवायची की नाही, लढवली तर कोणत्या पक्षाकडून तथा कोणत्या मतदारसंघातून लढायची, याविषयी काहीही ठरवलेले नाही. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेईन. एखादे पद मिळालेच पाहिजे, असा अट्टाहास असता कामा नये. लोकांच्या हितासाठी, प्रश्नांसाठी काम करत राहणे केव्हाही चांगले. पद, प्रतिष्ठा, पैसा हे एकीकडे ठेवले तरी महाराजांचा जिरेटोप, कवड्यांची माळ असणारे दुसरे पारडे माझ्यासाठी कायमस्वरूपी महत्त्वाचे आहे. ३५० वर्षे मागे जाऊन शिवरायांचा इतिहास सांगण्याची संधी मिळते, हेच माझ्या दृष्टीने भाग्याचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यानुसार, एखादा मतदारसंघ म्हणजे आपली मक्तेदारी आहे, असे मानणे चुकीचे आहे. कधीतरी बदल होणारच आहे. महाराजांचे विचार केवळ बोलण्यापुरते असता कामा नये, त्या विचारांचे अनुकरणही करता आले पाहिजे, असे मत डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयानं ठरवलं दोषी!

यावेळी राजेंद्र करपे, संतोष बाबर, संतोष निंबाळकर, नंदकुमार कांबळे, गोरख भालेकर, सचिन साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.

अजितदादांमुळेच खासदार होऊ शकलो…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी नुकत्याच जाहीर कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या होत्या. त्या संदर्भातील प्रश्नावर खुलासा करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, हे विधान अजित पवार की जयंत पाटील असे तुलनात्मक पातळीवर नव्हते. त्यामागे स्थानिक संदर्भ होते. अजित पवार यांच्यामुळेच आपण खासदार होऊ शकलो. पक्षप्रवेश, उमेदवारी या गोष्टी त्यांनी मोठ्या साहेबांच्या माध्यमातून करवून घेतल्या. अजितदादांचे पुत्र मावळ लोकसभा निवडणूक लढवत असतानाही तितकेच लक्ष अजितदादांनी शिरूरमध्ये दिले. त्यामुळेच अवघ्या २२ दिवसांच्या प्रचारात निवडणूक जिंकणे शक्य झाले. लोकप्रिय चेहरा असला तरी अजितदादांचे भक्कम पाठबळ लाभले म्हणूच निवडणूक जिंकता आली, असे ते म्हणाले. अजितदादांनी नियोजनबद्ध पणे पिंपरी चिंचवड शहर वसवले. पुणे जिल्हा हा मेडिकल टुरिझम व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वढू तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारासाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करून देणारे अजितदादा हे पहिले राजकीय नेते आहेत, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

तुमचा गोविंदा होऊ देऊ नका…

कलाक्षेत्रातून राजकारणात आल्यानंतर निवडून आलेला मी पहिला मराठी कलाकार आहे. हे महाराष्ट्रातील मतदारांना नवीन आहे. तुमच्या खासदाराचे उत्पन्नाचे साधन काय आहे, याचा विचार केला जात नाही. यासाठी राजकीय साक्षरता आवश्यक आहे. तुमचा “गोविंदा” होऊ देऊ नका, असे मला सुरुवातीला सांगणारे आता दूरध्वनी करून शाबासकी आणि शुभेच्छा देतात, याकडे डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले. थिएटर आणि शो मिळत नाही म्हणून टीडीएम या मराठी चित्रपटातील कलावंतांना अश्रू अनावर झाले, अशी वेळ येणे, ही दुर्देवी गोष्ट आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावरील चित्रपट चांगल्याप्रकारे सुरू असताना, द केरला स्टोरी हा सिनेमा विनामूल्य दाखवला जात आहे, हे चुकीचे आहे, असे मत त्यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button