breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजितदादा… पिंपरी चिंचवडमध्ये भाकरी फिरवा, अन्यथा सत्तेचे सिंहासन कोसो दूरच!

  • राष्ट्रवादीची बोटचिपी भूमिका; भाजप विरोधात हवा आक्रमक नवा चेहरा

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|

श्रीमंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुका सहा महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. तरीही राष्ट्रवादी काग्रेस शहर पदाधिकारी अजून साखर झोपेतच आहेत. महापालिकेतील भ्रष्ट व गैरकारभारावर कोणीही बोलायला तयार नाही. मात्र, ही महापालिका पुनश्च ताब्यात घेण्यासाठी पुर्वाश्रमीचे कारभारी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी काही महिन्यापुर्वी शहर पदाधिका-यांचे चांगलेच कान टोचून सत्ताधारी भाजप विरोधात आक्रमक व्हा, भ्रष्ट व गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याचा आदेश दिला होता. चिरीमिरीवर अस्तित्व गहाण ठेवू नका. असा सज्जड दमवजा इशारा पदाधिका-यांना दिला. परंतू,अजितदादांच्या आदेशाला शहर राष्ट्रवादी काग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी हरताळ फासला आहे.

महापालिकेतील भाजप विरोधी भूमिका घेताना कचखाऊ वृत्तीने आपआपल्या सोयीने, सगेसोयरे, नातं-गोतं सांभाळून टिका-टिपण्णी करु लागले आहेत. त्यामुळे हजारो कोटीचा बोगस एफडीआर प्रकरण, कोरोना काळातील खरेदी,अनियमितता, निविदा न राबविता थेट खरेदी, अव्वाच्या-सव्वा दराने स्मार्ट सिटीची खरेदी यासह शेकडो प्रकरणी चिडीचूप भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी घेतलेली पाहावयास मिळत आहे. त्यामुळे अजितदादांना… पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचे सिंहासन मिळवण्यासाठी भाकरी फिरवावीच लागेल, अन्यथा सिंहासन कोसो दूरच राहणार असल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता असताना पक्षवाढ, संघटन करण्यास कोणीही काम केले नाही. केवळ पदे घेवून आपआपली तुंबडी भरण्याचे उद्योग अनेकांनी केले. त्यामुळे नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद तुटला. त्यांच्याच फटका महापालिकेसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला बसला. पक्ष सत्तेतून पायउतार होताच शहर पदाधिका-यांनी लोकांमध्ये मिसळून कामे करायला हवीत. परंतू, वरवरचे काम करुन पक्षाला पहिल्या फळीतील नेत्यांनी घरघर लावली आहे.

अनेकांनी पक्ष संघटनेला महत्व न देता वैयक्तिक स्वार्थ पाहिल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये विकास कामे करुनही राष्ट्रवादीची बिकट अवस्था पाहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीआधी शहराचा आढावा घेतला. त्यावेळी अनेकांनी निवडणुकांच्या दृष्टीने भाकरी फिरवा, नवनव्या चेह-यांना संधी देण्याच्या सुचना कार्यकर्त्यांनी मांडल्या होत्या. त्यावेळी देखील कोणतेच बदल न केल्याने सपाटून मार खावा लागला.

महापालिका निवडणुकींच्या अनुषंगाने शहर पातळीवर बदल अपेक्षित असतानाही मागील सहा वर्षात जूने तेच तेच चेहरे लोकांसमोर घेवून जाण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे. नवख्या चेह-यांना संधी देवून पक्ष संघटन बळकट करायला हवे, परंतू, शहरातील नात्या-गोत्यांच्या राजकारणाचा फटका पक्षाला बसू लागला आहे. स्थानिक गाव वाल्यांनी बाहेरुन येवून प्रस्थापित झालेल्यांना सोबत घ्यायला अंतर्गत विरोध होवू लागला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीला गटबाजीचा फटका बसू लागला आहे. पक्षाने बेरजेचे राजकारण करताना सर्व समाज घटकांना बरोबर घ्यायला हवा. पण, नाती-गोती बाजूला ठेवून पक्षासाठी एकत्रित एकदिलाने काम केले, सर्वांना समान संधी दिली. तरच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेचे सिंहासन गाठणे शक्य होणार आहे.

कुठे आहेत विरोधी पक्षनेते!

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते हे त्यांच्या दालनात कधी येतात अन् कधी जातात. हे कळायला मार्ग नाही. विविध कामानिमित्त दररोज शेकडो नागरिक महापालिकेत येत असतात. त्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनाकडे डोकावताच, आत मध्ये स्वीय सहायक शिवाय कोणी दिसत नाही. त्या खुर्चीकडे पाहून नागरिकांना रिकाम्या हाताने जावे लागत आहे. तसेच महापालिकेतील स्मार्ट सिटी प्रकल्प, बोगस एफडीआर प्रकरण, वैद्यकीय-आरोग्याची थेट खरेदी यासह शेकडो प्रकरणात केवळ आयुक्तांना पत्र देण्यापलिकडे कोणतीच भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button