breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“नाना पटोलेंना वेड्यांच्या इस्पितळात भरती करा, सोनिया गांधींना पत्र पाठवणार”

मुंबई |

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं. यानंतर नाना पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असा दावा केला होता. पोलिसांनी या गावगुंडाला अटक केली आहे. मात्र याबाबत बोलताना नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं असं नाना पटोले म्हणाले आहेत. यावरुन भाजपाकडून राज्यभरात आंदोलनं केली जात आहे. नागपुरातही भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला. तसंच नाना पटोलेंना वेड्यांच्या इस्पितळात भरती करा यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे.

“नाना पटोलेंनी पुन्हा एकदा निंदाजनक आणि अत्यंत वाईट वक्तव्य केलं आहे. त्यांना वेड लागलं आहे. त्यांना लाज, शरम उरलेली नाही. देशाचे पंतप्रधान ज्यांचा जगातील सर्वोत्कृष्ठ नेते, पंतप्रधान म्हणून गौरव केला जात आहे त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने ते बोलत आहेत,” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

“नाना पटोले आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी व्यक्तिगत टीका करत आहेत. भाजपा नाना पटोलेंना सोडणार नाही. महाराष्ट्रभर त्यांचे पुतळे जाळले जातील. त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सोनिया गांधींना पत्र पाठविणार आहोत,” असंही ते म्हणाले. त्यांनी ५० कोटी महिलांचा अपमान करणारं वक्तव्य केलं असल्याने बांगड्यांचा आहेर पाठवणार असल्याचंही ते बोलले.

  • नाना पटोलेंचं स्पष्टीकरण…

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर एका गावगुंडाबाबत असं बोललो होतो हे आधीच स्पष्ट केलं होतं. आम्हाला पंतप्रधानपदाचा सन्मान माहिती आहे, भाजपाला ते माहिती नाही. मनमोहन सिंग यांच्याविरोधात ते काय बोलत होते हे सर्वांना माहिती आहे. एका गावगुंडाचं भाजपा इतकं समर्थन का करत आहे? हा प्रश्न जनतेसमोर आहे. हा विषय संपला असून जनतेचे प्रश्न सोडवणं गरजेचं आहे,” असं नाना पटोले म्हणाले आहेत.

“गावगुंडाने माध्यमांसमोर येऊन मला मोदी का म्हणतात यासंबंधी सांगितलं, तेच वाक्य मी म्हटलं. बदनामी करण्याचं काम थांबवा असं मी सांगितलं असून गावगुंडाचं समर्थन करण्याचं कारण काय? पुतळे जाळायचे असतील तर भारतमाता की जय म्हणून देश विकणाऱ्यांचे जाळा. बेटी बचाव बेटी पटाव म्हणणाऱ्यांचे जाळा, शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारणाऱ्या केंद्रातील मंत्र्याच्या विरोधात जाळा. देशात बेरोजगाऱी असून शेतकरी, व्यापारी आत्महत्या सुरु आहेत. ज्यांनी या व्यवस्थेला निर्माण केलं त्यांचे पुतळे जाळले पाहिजेत. पण मूळ मुद्याला भाजपा फिरवण्याचं काम करत असून देशातील आणि महाराष्ट्रातील जनता ओळखत आहे,” असंही नाना पटोले म्हणाले.

“काँग्रेस नेहमी गावगुंडाविरोधात राहणार. ते त्याचा अर्थ काय लावत असतील तो त्यांचा प्रश्न आहे. गावगुंड बोलला असून आतो तो विषय आता थांबवला पाहिजे. माझे पुतळे जाळण्याची, उद्धार करण्याची प्रक्रिया किती दिवस सुरु ठेवायची ते ठेवावं. पोलीस यासंबंधी कारवाई करतील. पण राज्यात करोनाची स्थिती असतानाही आंदोलन कशाला? गावगुंडासाठी इतकं प्रेम कशाला?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

जो न्याय नारायण राणेंसाठी होता तोच नाना पटोलेंसाठी हवा या भाजपाच्या मागणीवर ते म्हणाले की, “नारायण राणेंचं आणि माझं वाक्य काय होतं? मी प्रधानमंत्र्यांविरोधात बोललो नसून गावगुंडाबाबत बोललो. तो गावगुंड समोर आला असताना मग बालहट्ट कशासाठी? मूळ प्रश्नापासून लोकांना दूर नेलं जात आहे. सुसंस्कृत पक्षाचे लोक आहात तर मग महिला, मुलींचा अपमान करणाऱ्यांना काही बोलणार नाही का? आत कुठे गेली अक्कल? माझ्या वाटेला आल्याने त्यांचा फायदा होत असेल तर यावं. काँग्रेस गावगुडांच्याविरोधात असून कायम राहणार”. “भाजपाची जी बदनामी होत आहे ती झाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. बेटी बचाव बेटी पटाव हे वाक्य त्यांना मान्य आहे का?,” अशी विचारणा नाना पटोले यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button