ताज्या घडामोडीमुंबई

२६६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

१६ चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी रद्द

कल्याण  | होळीच्या दुसऱ्या दिवशी कल्याण-डोंबिवलीतील अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान करून मोटार, दुचाकी चालवून वाहतूक नियमांचा भंग केला. अशा एकूण २६६ जणांवर कल्याण-डोंबिवली वाहतूक विभागाने कारवाई करून एक लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कल्याण, डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक विभागांतर्गत कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, कोळसेवाडी विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असल्याने रस्ते, चौक, नागरी वस्तीत कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहतूक पोलीस, पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.

या बंदोबस्तादरम्यान अनेक तरुण मद्यपान, ताडी, भांग पिऊन होळीचा आनंदोत्सव साजरा करत होते. नशेत असताना मोटार, दुचाकी चालवून वाहतूक नियमांचा भंग करत होते. दुचाकीवर दोन आसनांची क्षमता असताना तीन जण बसून प्रवास करत होते. अनेक वाहनचालकांकडे वाहनाची कागदपत्रे, विमा कर भरल्याची कागदपत्रे नव्हती. काही जणांकडे वाहन मूळ मालकाचे आणि चालवितो दुसरा असे वाहतूक अधिकाऱ्यांना तपासणीत दिसले. कल्याणमध्ये २४, डोंबिवलीत १०, कोळसेवाडी हद्दीत २५ जणांना मद्यपान करून दुचाकी चालविताना वाहतूक पोलिसांनी पकडले. हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या १२५ चालकांवर, दुचाकीवर तीन जण बसून प्रवास करणाऱ्या ६९ जणांवर कारवाई करण्यात आली, असे वाहतूक अधिकारी महेश तरडे यांनी सांगितले. ५९ मद्यपींपैकी ११ जणांना वाहतूक अधिकाऱ्यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याने न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला. पाच जणांकडे वाहन परवाना नसताना वाहन चालविल्याने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या चालकांनी इतर वाहतूक नियम भंग केल्याने त्यांच्याकडून एकूण २५ हजार रुपये दंड वसूल केला. १६ जणांना मोटार वाहन कायद्याची ओळख कायम राहावी म्हणून वाहतूक विभागाने १६ जणांचे वाहन चालक परवाने दंडात्मक कारवाईचा भाग म्हणून तीन महिन्यांसाठी रद्द केले आहेत, असे तरडे यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button