breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

संरक्षण परीक्षेत मावळातील वडगावच्या तरुणाचा झेंडा; ‘सीडीएस’ परीक्षेत देशात २० वा

लोणावळा : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परीक्षेत वडगाव मावळ येथील अदित्य विवेक गायकवाड याचा देशात २० वा नंबर आला आहे. अदित्य लवकरच डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमी येथे प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहे. त्याच्या यशाने वडगावच्या नावलौकीकात आणखीनच भर पडली आहे.

‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) ही परीक्षा पदवीनंतर संरक्षण दलात रूजू होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून तरुणांना लष्कराच्या तिन्ही दलांत अधिकारी होण्यासाठीची संधी मिळते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांना ‘एसएसबी’ मुलाखतीसाठी बोलवले जाते. या मुलाखतीत विविध प्रकारच्या चाचण्यांनंतर त्यांची वैद्यकीय चाचणी होते. त्यानंतर मूळ प्रवेश परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणी, या तिन्ही गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम राष्ट्रीय गुणवत्ता श्रेणी (रँकिंग) ठरते व अंतिम प्रशिक्षणासाठी निवड होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने सीडीएस परीक्षेचा निकालांची नुकतीच घोषणा केली. यामध्ये अदित्य गायकवाड देशात २० वा आला आहे.

संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी प्रवेश परीक्षा ही अत्यंत अवघड मानली जाते. मात्र अदित्येने सीडीएस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. यावर्षी देशभरातून जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली होती. त्यापैकी साडेचार हजार विद्यार्थी लेखी परिक्षेसाठी पात्र ठरले. यापैकी केवळ १४२ विद्यार्थांची निवड झाली आहे. अदित्येने औरंगाबादच्या देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज येथे ‘बी टेक’ पदवी घेतली आहे. वडगाव मावळ येथे लहानाचे मोठे झालेले अदित्यचे वडील कर्नल विवेक गायकवाड हे सध्या आसाम येथे कर्तव्यावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अदित्य याने हे यश कुठल्याही शिकवणी विना मिळवले आहे. वडगावकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदित्य भारतीय नौदल अकादमीमध्ये कार्यकारी शाखेत रूजू होणार आहे. कमिशनिंग झाल्यावर तो सशस्त्र दलातील त्यांच्या कुटुंबातील दुसऱ्या पिढीतील अधिकारी असणार आहे.

‘नेव्हल पायलट होण्याचे स्वप्न’

अदित्य आपल्या यशाबद्दल म्हणाला की, ‘इतर कोणी आपल्यावर विश्वास ठेवण्याआधी, आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःवरील दृढ विश्वास, परिश्रम आणि समर्पण याने ध्येय साध्य होते,’ असे मत व्यक्त करत नेव्हल पायलट होण्याचे आपले स्वप्न असल्याचे अदित्य म्हणाला. बी टेक पदवी प्राप्त केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासासाठी जर्मनी येथील स्कॉलरशिप सोडून अदित्यने देशसेवेसाठी सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेत ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (CDS) परीक्षेची तयारी करत यश प्राप्त केलं असल्याचं अदित्य याचे वडील कर्नल विवेक गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button