ताज्या घडामोडीमुंबई

डोंबिवलीत विशिष्ट प्रजातींच्या चिमण्यांचा वावर;

पर्यावरणप्रेमी, पक्षी निरीक्षकांचे मत

ठाणे | वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होत असल्याचे विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. असे असताना क्वचितच आढळून येणाऱ्या यल्लो थ्रोटेड स्पॅरो (पीतकंठी चिमणी) या चिमण्यांच्या दुर्मीळ प्रजातींचा डोंबिवलीमधील काही हिरवळीच्या भागांत वावर वाढला असल्याची सकारात्मक बाब पर्यावरणप्रेमींच्या निरीक्षणातून समोर येऊ लागली आहे.

भारतीय उपखंडात चिमण्यांच्या आठ प्रजाती आढळून येतात. यामध्ये महाराष्ट्रात प्रामुख्याने हाऊस स्पॅरो (साधी चिमणी) आणि पीतकंठी चिमणी यांचा समावेश होते. गेल्या काही वर्षांत सर्वत्र सुरू असलेली जंगलतोड, वणवे यामुळे विविध पक्षी प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासास धोका निर्माण होत आहे. वाढते शहरीकरण, प्रदूषण यामुळे चिमण्यांच्या प्रजनन प्रक्रियेवरदेखील परिणाम होऊ लागला. यामुळे चिमण्यांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात झाली.

डोंबिवलीमधील भोपर, उंबार्ली टेकडी, सातपूल, मलंग, गणेश घाट या ठिकाणी मागील काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमींकडून मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड केली जात आहे. यामुळे काही दिवसांपासून या भागांमध्ये परदेशी पक्ष्यांबरोबरच क्वचितच आढळून येणाऱ्या पीतकंठी चिमण्यांचा वावर वाढल्याचे मत काही पक्षी निरीक्षकांनी नोंदविले आहे. डोंबिवलीतील युवा पक्षीनिरीक्षक अर्णव पटवर्धनने या चिमण्यांचे छायाचित्र टिपले आहे.

जगविख्यात भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि निसर्गशास्त्रज्ञ म्हणून डॉ.सलीम अली यांनी संपूर्ण भारतामध्ये पक्षांच्या विविध प्रजातींचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी डॉ. सलीम अली यांना चिमणीची यल्लो थ्रोटेड स्पॅरो (पीतकंठी चिमणी) ही प्रजाती आढळून आली. या प्रजातीच्या चिमण्या प्रामुख्याने विरळ जंगलात आढळून येतात.

चिमणी हा पक्षी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. चीनमधील सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान हाती घेण्यात आले होते. त्यानंतर पर्यावरण आणि अन्नसाखळीवर त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून आले होते. यानंतर जगभरात चिमण्यांचे घटते प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये चिमणीचे अन्नसाखळीतील महत्त्व तसेच चिमणी वाचविण्याच्या जनजागृतीसाठी २०१० पासून २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

पीतकंठी चिमण्यांचा वावर वाढला असल्याची आनंदाची बाब आहे. पक्षी निरीक्षणामुळे विविध दुर्मीळ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद ठेवली जात आहे. अनेक दुर्मीळ प्रजाती जगसमोर येत आहेत. यातून या दुर्मीळ प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – डॉ. सुधीर गायकवाड, पक्षीनिरीक्षक, ठाणे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button