TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रे’चा आज नांदेडमधून शुभारंभ; ३५ दिवस आरोग्य सेवांचा घेतला जाणार आढावा

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाडी बु. येथील नवीन ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर शासकीय रुग्णालयांना देणार प्रत्यक्ष भेटी.

मुंबई : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा आज, १ नोव्हेंबर रोजी नांदेड येथून शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाडी बु. (पावडेवाडी) येथील नूतन ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या ३५ दिवसांच्या कालावधीत ही यात्रा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित केली जाणार आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर शासकीय आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेणार आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्ण आणि नागरिकांशी थेट संवाद साधून आरोग्य यंत्रणेसमोरील अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

ग्रामीण आरोग्य संस्थांची प्रत्यक्ष पाहणी

यात्रेच्या पहिल्या दिवशी हिमायतनगर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देण्यात येणार आहे. यावेळी रुग्णकल्याण समितीची बैठक घेऊन रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, औषधसाठा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे.

तसेच वाळकेवाडी आणि दरेगाव तांडा येथे भेट देऊन स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या कामाचा आढावा

नांदेड येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाची पाहणी करण्यात येणार आहे. याशिवाय आशियाई विकास बँकेच्या (ADB) प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या ५०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाच्या कामाचाही आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा –  तिहार तुरुंगातील आठवडाभराच्या अनुभवावर सौरभ दास यांचा खुलासा; म्हणाले, ‘ज्ञानेश कुमार यांना हटवल्याशिवाय माघार नाही’

वाडी बु. ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली वाडी बु. (पावडेवाडी) येथील नूतन ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक जवळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी

लोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य सेवांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच नांदेडमधील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न रुग्णालयांना भेट देऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधण्यात येणार आहे.

यावेळी योजनेची अंमलबजावणी, उपलब्ध उपचार सुविधा आणि रुग्णांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न

या ३५ दिवसांच्या यात्रेदरम्यान राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील औषधसाठा, वैद्यकीय उपकरणे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता, स्वच्छता, रुग्णालय व्यवस्थापन तसेच उपचार सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे.

नागरिक, रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख करणे, हा राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रे’चा मुख्य उद्देश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button