TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

Bollywood News : प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड

 निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावरून दिली निधनाची माहिती; हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते संजय गुप्ता यांचे निधन झाले आहे. ‘कांटे’, ‘शूटआउट ॲट वडाळा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.

अशोक पंडित यांनी व्यक्त केला शोक

अशोक पंडित यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये संजय गुप्ता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ते एक उत्तम कथाकार, उत्साही व्यक्तिमत्त्व आणि चित्रपटसृष्टीवर मनापासून प्रेम करणारे निर्माते होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय गुप्ता यांच्या कुटुंबीयांप्रती आणि जवळच्या व्यक्तींप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, संजय गुप्ता यांचे 30 ऑक्टोबरच्या रात्री निधन झाले. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, घटनेबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा- राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम मदत; 2 नोव्हेंबरपासून खात्यात पैसे जमा होणार?

‘आतिश’ चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण

संजय गुप्ता यांनी 1994 मध्ये ‘आतिश : फील द फायर’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य पांचोली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करत हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

‘कांटे’सह अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन

2002 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कांटे’ हा संजय गुप्ता यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, लकी अली आणि कुमार गौरव यांसारखे कलाकार या चित्रपटात झळकले होते. चित्रपटाची कथा, ॲक्शन आणि वेगळी मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. कालांतराने या चित्रपटाला कल्ट चित्रपटाचा दर्जा मिळाला.

याशिवाय त्यांनी ‘मुसाफिर’, ‘शूटआउट ॲट वडाळा’, ‘काबिल’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ या चित्रपटाच्या निर्मितीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मुंबईतील अंडरवर्ल्ड, गुन्हेगारी विश्व आणि गँगस्टर्सच्या जीवनावर आधारित कथांना वेगळ्या शैलीत पडद्यावर सादर करणे ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक वेगळ्या शैलीचा दिग्दर्शक गमावला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button