नालासोपाऱ्यात लिफ्ट कोसळून ७ जण जखमी; आमदार राजन नाईक यांनी घेतली घटनास्थळाची माहिती
Virar News : धनंजय एव्हेन्यू इमारतीतील दुर्घटनेनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण; जखमींना रुग्णालयात दाखल, एक्स-रे तपासणी सुरू.

विरार : मुंबई उपनगरातील वसई-विरार परिसरातील नालासोपारा पश्चिम येथील धनंजय एव्हेन्यू इमारतीत शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास लिफ्ट कोसळल्याची दुर्घटना घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये तीन महिलांचाही समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आमदार राजन नाईक यांनी घेतली घटनास्थळाची माहिती
दरम्यान, दुर्घटनेनंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीची माहिती दिली. पाटणपार येथील इमारतीत लिफ्ट कोसळल्याची घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींचे एक्स-रे काढण्याचे काम सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली जात असल्याचे आमदार राजन नाईक यांनी स्पष्ट केले.
लिफ्टच्या तांत्रिक समस्यांबाबत आधीच तक्रारी?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लिफ्ट ओमेक्स कंपनीची असून, अवघ्या दोन वर्षांपूर्वी तिचे सोसायटीकडे हस्तांतरण करण्यात आले होते. इमारत नवीन असतानाही लिफ्ट कोसळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लिफ्टमध्ये वारंवार तांत्रिक समस्या येत असल्याने सोसायटीकडून वेळोवेळी बिल्डरकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, बिल्डरने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे नव्या इमारतींमधील लिफ्टची सुरक्षितता, नियमित देखभाल आणि तांत्रिक तपासणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लिफ्ट नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली, याची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. जखमींच्या प्रकृतीबाबत आणि अपघाताच्या कारणांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.




