आयुर्वेद, संतुलित आहार आणि योगातून निरोगी जीवनशैलीला चालना; आयुष चिकित्सा अधिक सक्षम करणार
ग्रामीण-शहरी भागात आयुष सेवांचा विस्तार करण्यावर भर; राज्यातील २६१ आरोग्य संस्थांमध्ये आयुष सेवा, ३९० ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिरांत सुविधा

मुंबई : भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र हे निरोगी आयुष्याचे महत्त्वाचे आधार आहेत. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नयेत यासाठी आयुर्वेद, संतुलित आहार आणि योगाचा अंगीकार करणे आवश्यक आहे. भारताने जगाला दिलेल्या आयुर्वेद उपचारपद्धतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, शहरी तसेच ग्रामीण भागात आयुष चिकित्सा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
राष्ट्रीय आयुष अभियानाच्या वतीने आयुर्वेद दिन आणि सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘पारंपरिक खाद्य पाककृती’, ‘भविष्यासाठी आयुर्वेद’ आणि ‘वार्धक्य काळात आयुर्वेदाची साथ’ या हस्तपुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
२६१ आरोग्य संस्थांमध्ये आयुष सेवा
राज्यात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत २६१ आरोग्य संस्थांमध्ये आयुष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ३९० ठिकाणी आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून आयुष चिकित्सा नागरिकांना उपलब्ध होत आहे. आयुष ग्राम, आयुष्मान आरोग्य मंदिर आणि योग दिनाच्या माध्यमातून आयुष चिकित्सा तसेच निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येत आहे. आगामी काळात आयुष संस्थांचे अधिक बळकटीकरण करण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ तसेच आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने निरोगी जीवनशैली, संतुलित आहार, योग आणि आयुर्वेदाशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ हे यावर्षीचे ब्रीदवाक्य आहे. आयुर्वेदाचा केवळ प्रचार-प्रसार न करता त्याचा प्रभावीपणे जनतेपर्यंत विस्तार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन आबिटकर यांनी केले.
हेही वाचा – नवकल्पनांना मिळणार ₹५ कोटींचे बळ; ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये १० क्षेत्रांत संधी
आधुनिक आरोग्य व्यवस्थेसोबत समन्वय
आयुष चिकित्सा पद्धतीबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून या उपचारपद्धतीबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. आधुनिक आरोग्य व्यवस्थेसोबत आयुष चिकित्सा पद्धतीचा प्रभावी समन्वय साधून नागरिकांना व्यापक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य सेवा आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आयुष अभियान संचालक वैद्य रमण घुंगराळेकर, संचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. अर्चना भोसले यांच्यासह राज्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी, योग प्रशिक्षक आणि अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.





