Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर परिणाम; जलस्रोतांची तातडीने पाहणी करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

‘ट्रिगर-१’मधील तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशयांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश; मच्छिमारांच्या उपजीविकेवरील परिणामाची माहिती संकलित करण्याच्या सूचना

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘दुष्काळ ट्रिगर-१’मध्ये समाविष्ट तालुक्यांतील मत्स्य तलाव, जलाशय आणि संबंधित जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीची अचूक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी आणि मत्स्यव्यवसायावर होणाऱ्या परिणामाची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, अशा सूचनाही राणे यांनी दिल्या.

दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे जलस्रोतांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने मासेमारीतील अडचणी, मच्छिमारांच्या उपजीविकेवरील परिणाम आणि मत्स्य उत्पादनातील संभाव्य घट याची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती नियमितपणे घेण्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा –  आयुर्वेद, संतुलित आहार आणि योगातून निरोगी जीवनशैलीला चालना; आयुष चिकित्सा अधिक सक्षम करणार

अपुरा पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेला अपुरा पाणीसाठा याचा परिणाम मत्स्यबीज संचयन आणि मत्स्योत्पादनावर होत आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमध्येही आवश्यकतेनुसार उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण रोजगार आणि मत्स्योत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ‘ट्रिगर-१’मधील तालुक्यांतील जलस्रोतांची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे नोंदवून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश राणे यांनी दिले.

मच्छिमारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामाचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांसाठी विभागाने तत्पर राहावे. अधिकाऱ्यांनी संकलित केलेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून त्यानुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button