नवकल्पनांना मिळणार ₹५ कोटींचे बळ; ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये १० क्षेत्रांत संधी
२३ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू; महिला, युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स आणि संशोधकांसाठी विशेष श्रेणी; ७ डिसेंबरला नागपुरात अंतिम प्रदर्शन

मुंबई : केवळ समस्या मांडण्याऐवजी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून त्यावर प्रभावी, व्यवहार्य आणि लोकाभिमुख उपाय शोधण्याच्या उद्देशाने ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा राबविण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी २३ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड तसेच केंद्रशासित प्रदेश दमण-दीव येथील नवोन्मेषकांना आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना, तंत्रज्ञान किंवा उपाय सादर करण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत कृषी, कायदा व सुव्यवस्था, महिला व बालकल्याण, नागरी विकास, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण, शाश्वतता-ऊर्जा-हवामान, पायाभूत सुविधा व मोबिलिटी, उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच शिक्षण व रोजगारक्षमता या १० प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांअंतर्गत ५० उपक्षेत्रांमध्ये नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
हवामान-सक्षम शेती, सायबर फसवणूक प्रतिबंध, महिलांची सुरक्षितता, शहरी पूरव्यवस्थापन, स्मार्ट डायग्नोस्टिक्स, संरक्षण तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, वाहतूक व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नागरिक सेवा, मराठी-प्रथम AI, रोजगार-जॉब मॅचिंग आणि AI आधारित करिअर मार्गदर्शन यांसारख्या विषयांवरील नवकल्पनांना सहभागी होता येणार आहे.
हेही वाचा – गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाचा अनुभव घेण्यासाठी परदेशी पर्यटक; पर्यटन विभाग उभारणार विशेष दालन
कोणाला सहभागी होता येणार?
व्यक्ती, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, एमएसएमई, कंपन्या, सामाजिक संस्था, शैक्षणिक व संशोधन संस्था तसेच इतर इनोव्हेशन टीम्स या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अर्जदाराची नवकल्पना स्पर्धेतील १० निश्चित क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्राशी संबंधित असणे आवश्यक आहे.
१० क्षेत्रांसाठी ₹५ कोटींची पुरस्कार रक्कम
स्पर्धेतील १० क्षेत्रांसाठी एकूण ₹५ कोटींची पुरस्कार रक्कम ठेवण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रातून पाच विजेत्यांची निवड केली जाणार असून, प्रत्येक विजेत्याला ₹१० लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रात एक महिला श्रेणीतील विजेता, एक २१ वर्षांखालील श्रेणीतील विजेता आणि तीन खुल्या श्रेणीतील विजेत्यांचा समावेश असेल.
२०० नवकल्पनांचे अंतिम प्रदर्शन
स्पर्धेसाठी सुमारे १,५०० ते २ हजार अर्ज प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. प्राथमिक पात्रता तपासणीनंतर ऑनलाइन तज्ज्ञ मूल्यांकन, तांत्रिक मूल्यांकन आणि प्रभाव मूल्यांकन अशा विविध टप्प्यांतून अर्जांची छाननी होणार आहे.
त्यानंतर प्रत्येक क्षेत्रातून सुमारे २० अशा एकूण २०० अंतिम स्पर्धकांची प्रदर्शनासाठी निवड केली जाणार आहे. समस्येची प्रासंगिकता, नावीन्य, तंत्रज्ञानाची परिपक्वता, संभाव्य प्रभाव, विस्तारक्षमता, अंमलबजावणीची क्षमता आणि प्रत्यक्ष वापराची शक्यता या निकषांवर नवकल्पनांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
७ डिसेंबरला नागपुरात अंतिम सोहळा
स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथे होणार आहे. अंतिम टप्प्यात निवडलेल्या स्पर्धकांकडून नवकल्पनांचे सादरीकरण आणि प्रात्यक्षिक घेण्यात येईल. अंतिम प्रदर्शनात सुमारे २०० नवकल्पनांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, शासन, उद्योग, गुंतवणूकदार आणि इनक्युबेटर्स यांच्यासमोर आपल्या कल्पना सादर करण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ ही केवळ स्पर्धा न राहता नवकल्पनांना प्रत्यक्ष लोकसेवा आणि विकास प्रक्रियेत आणणारी चळवळ ठरावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निवड झालेल्या नवकल्पनांना पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता पायलट प्रकल्प, शासकीय खरेदी, इनक्युबेशन, गुंतवणूक आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी २९ सप्टेंबरला रोजगार मेळावा
दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी एसएनडीटी महिला विद्यापीठात रोजगार महाकुंभाचे उद्घाटन होणार असून, यावेळी लाडक्या बहिणींसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
नामांकित कंपन्यांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात येणार असून, उपलब्ध पदे, पात्रता, कामाचे स्वरूप, वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती महिला उमेदवारांना मिळणार आहे. कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधीही त्यांना उपलब्ध होणार आहे.





