लग्नात काढला अख्ख्या गावाचा विमा, नांदेडच्या ‘या’ कुटुंबाचे पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये केले कौतुक

Mann ki baat : आजकालची लग्नं म्हटली की डोळे दिपवणारी रोषणाई, महागडे कपडे आणि पैशांचे अवाढव्य प्रदर्शन असे समीकरणच बनले आहे. पण याच झगमगाटाच्या जगात नांदेडमधील एका कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नात असा काही आदर्श घालून दिला आहे, ज्याची थेट देशाच्या पंतप्रधानांनी दखल घेतली आहे. लग्नकार्यातील अवाजवी खर्चाला फाटा देत या कुटुंबाने संपूर्ण गावालाच सुरक्षेचे एक अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’ दिले असून, सध्या याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३५ व्या भागात या कौतुकास्पद उपक्रमाचा विशेष गौरव केला.
पंतप्रधान मोदींनी पेठकर कुटुंबाच्या या सामाजिक जाणिवांचे कौतुक करताना सांगितले, “नांदेडमधील बहादरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. आपल्या घरातील आनंदाचा क्षण साजरा करताना, संकटाच्या काळात एखाद्या कुटुंबाला आधार ठरेल असे काहीतरी करावे, असे या कुटुंबाला वाटले. घरातील लग्नाचे औचित्य साधून त्यांनी गावातील तब्बल ३,५०० नागरिकांचा अपघात विमा उतरवला. प्रत्येक व्यक्तीला १ लाख रुपयांचे विमा कवच देण्यात आले आहे. या उपक्रमामागील त्यांची भावना खरोखरच मनाला भिडणारी आहे.”
कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांचा विवाह २० मे रोजी संपन्न झाला. या लग्नाचे औचित्य साधत पेठकर कुटुंबाने सामाजिक भान जपले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांना नेहमीचे पारंपरिक आहेर किंवा भेटवस्तू देण्याऐवजी, त्यांनी आपल्या बहादरपुरा गावातील प्रत्येक नागरिकाचा अपघात विमा उतरवला. सिद्धेश्वर आणि त्यांचे मोठे भाऊ अनूप पेठकर यांच्या संकल्पनेतून हा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – आता फक्त ५० रुपयांत जा किल्ले रायगडावर, महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
या अनोख्या उपक्रमांतर्गत गावातील तब्बल ३ हजार ४६५ नागरिकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे अपघात विमा कवच देण्यात आले आहे. म्हणजेच पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाची मिळून एकूण ३३.६ कोटी रुपयांची सामूहिक विमा पॉलिसी काढली आहे.
“लग्नाचा आनंद केवळ आमच्यापुरता मर्यादित न राहता तो गावकऱ्यांच्या आयुष्यात सुरक्षितता आणणारा ठरावा,” अशी भावना अनुप पेठकर यांनी व्यक्त केली. या कल्पनेविषयी बोलताना ते म्हणाले, “ग्रामीण भागात सर्पदंश, अंगावर वीज पडणे किंवा इतर अनपेक्षित अपघातांमुळे मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा घडतात. अशा वेळी गरीब कुटुंबांवर आभाळ कोसळते. माझ्या लहान भावाचे लग्न हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. हाच आनंद द्विगुणित करताना गावकऱ्यांसाठी काहीतरी ठोस आणि उपयुक्त करावे, या विचारातून आम्ही हा निर्णय घेतला.”





