पेट्रोल-डिझेलबाबत CM फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश, ‘इंधनाची साठेबाजी करत असेल तर…’

Petrol-Diesel : राज्यातील काही भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत अचानक २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संशय व्यक्त केला असून, यामागे साठेबाजीसारखा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे डिझेल वेळेत उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडे दरवर्षी लागणाऱ्या इंधनाचा अंदाज असतो. मात्र, काही भागांत अचानक मागणीत मोठी वाढ दिसून येत असल्याने परिस्थितीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी इंधनाची साठेबाजी करत असेल, तर त्यावर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळण्यात अडचणी येत असल्याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट केले. काही जिल्ह्यांत वाहनांचे आरसी बुक तपासूनच डिझेल देण्याची पद्धत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा – शिवसेनेकडून ‘हा’ बडा नेता विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी राज्य सरकारने हालचाली वाढवल्या असून, पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शिर्डी परिसरातील सावळीविहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून, यामुळे स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. धार्मिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या शिर्डीची ओळख आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातही निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.





