Big News : मोशी प्रभाग- 2 मधील तिढा अखेर सुटला; अशी होणार लढत!
मिशन-PCMC: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश वाचा फक्त ‘‘महाईन्यूज’’ वर!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 मोशीतील भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांमध्ये अर्ज छाननी दरम्यान सुरू असलेला गोंधळ आणि गदारोळ अखेर संपला आहे. महापालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुंच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले आणि निकाल जाहीर केला आहे.
भाजपाचे उमेदवार राहुल जाधव यांनी छाननी वेळी ‘‘मला प्रभाग क्रमांक २ क मधून माझा अर्ज कायम ठेवण्यात यावा व सदर जागेसाठी सादर केलेला उमेदवारी अर्ज मंजुर करण्यात यावा असा लेखी अर्ज देऊन विनंती केली. त्याला मान्यता मिळाली आहे. तसेच, राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल आहेर आणि वसंत बाराटे यांनी केलेली तक्रार फेटाळून लावली आहे.
उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी क- प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. रात्री उशीरापर्यंत सुनावणी झाली. या सुनावणीला भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे स्वत : उपस्थित राहीले. दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी ‘‘मीडिया ट्रायल’’ केली. राहुल जाधव यांचा अर्ज बाद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला आणि आज सकाळी ११ वाजता निर्णय दिला. हा निर्णय राष्ट्रवादीची मागणी फेटाळणारा आहे.
हरकतदार विशाल आहेर आणि वसंत बोराटे यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल गुलाब जाधव यांच्यासाठी क- सर्वसाधारण गटातील जोडपत्र १ व २ आणि निखिल शिवाजी बो-हाडे यांच्यासाठी ड- सर्वसाधारण गटातील जोडपत्र १ व २ अधिकृत करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
भारतीय जनता पक्षाचे जोडपत्र १ व २ तसेच प्राधिकृत व्यक्तीचे पत्र हे दि. ३०/१२/२०२५ रोजी दुपारी ३.०० पुर्वी प्राप्त झाले आहे. पक्षाचे जोडपत्र १ व २ अपलोड करण्याची तरतूद नाही. प्राधिकृत व्यक्ती यांनी लिहीलेल्या पत्रावरती जावक क्रमांक व शिक्का नाही ही वस्तुस्थीती आहे. पण, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे सुनावणीला उपस्थित राहीले आणि पक्षाची अधिकृत भूमिका मांडली.
भाजपाचे निखिल बो-हाडे यांच्या उमेदवारी अर्जासाठी भारतीय जनता पार्टी यांच्याकडून पक्षाचे जोडपत्र १ व २ हे प्रभाग क्रमाक २ ड साठी एकच प्राप्त झाले असून, राहुल जाधव यांच्या उमेदवार अर्जासाठी प्रभाग क्रमांक २ क व प्रभाग क्रमांक २ ड या प्रभागातील या दोन्ही जागेसाठी स्वतंत्रपणे पक्षाचे जोडपत्र १ व २ प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर प्राधिकृत व्यक्ती यांचे राहुल जाधव यांचा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक २ क साठी अधिकृत करण्यात यावा असे पत्र प्राप्त झाले आहे.
एका प्रभागातील एका जागेसाठी निवडणूक लढविण्या संदर्भात मा. राज्य निवडणूक आयोगाच्या क्र. रानिआ/मनपा-२०१६ / प्र.क्र.८/का.५ दि. ३/१/२०१७ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीमध्ये एक उमेदवार एका प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढवू शकेल. तथापि, अन्य प्रभागातील जागेवर त्या उमेदवाराने निवडणूक लढविण्यास बंदी असणार नाही. एका उमेदवाराने एकाच प्रभागातील एकापेक्षा जास्त जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केल्यास छाननीच्या वेळी कोणत्या जागेची निवडणूक लढवावयाची आहे. या विषयी उमेदवाराची लेखी इच्छा विचारात घेण्यात यावी. उमेदवाराने अशी इच्छा व्यक्त न केल्यास प्रथमतः प्राप्त झालेले वैध नामनिर्देशन पत्र विचारात घेण्यात यावे, असे निरीक्षण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश पुढीलप्रमाणे :





