शिवसेनेकडून ‘हा’ बडा नेता विधानपरिषदेच्या मैदानात? साळवींच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

MLC Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण तापू लागले आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघासाठी आता राजन साळवी यांच्या नावाची शिवसेनेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे संकेत स्वतः राजन साळवी यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीमधील जागावाटपाबाबत बोलताना साळवी यांनी, तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील. काही जागांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, असे सांगितले.
महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला असून, त्यानुसार भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून तब्बल 7 जागांची मागणी करण्यात आल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला असताना, शिवसेनेकडूनही या जागेसाठी जोरदार आग्रह धरला जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागावाटपात तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपचे वरिष्ठ नेते आणि शिंदे गटामध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असून, काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल करण्याचा पर्यायही विचाराधीन आहे.
हेही वाचा – पुढच्या 72 तासांमध्ये हवामान बदलणार! मान्सूनबाबत मोठी अपडेट समोर
प्राथमिक चर्चेनुसार महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला
भाजप – 12 जागा
शिवसेना – 3 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 2 जागा
पक्षनिहाय दावे असलेल्या जागा
राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
हिंगोली – परभणी
शिवसेना
ठाणे, नाशिक, यवतमाळ
भाजप
नागपूर
वर्धा -चंद्रपूर – गडचिरोली
अहिल्यानगर
छत्रपती संभाजीनगर – जालना
सातारा – सांगली
पुणे
जळगाव
नांदेड
भंडारा – गोंदिया
अमरावती
लातूर – धाराशीव – बीड
सोलापूर
येत्या काही दिवसांत महायुतीतील जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून, कोकणातील या जागेवर कोणाचा दावा मजबूत ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





