गड-किल्ल्यांच्या नावांनी सजली पिंपरी-चिंचवडची नवी प्रशासन रचना!
महापालिकेत ८ वरून १० क्षेत्रीय कार्यालये, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मागणीला यश

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनात मोठा बदल करत विद्यमान ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून आता १० क्षेत्रीय कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या नव्या क्षेत्रीय कार्यालयांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नावे देण्यात आल्याने प्रशासनाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीची जोड मिळाली आहे.
महापालिकेच्या १३ मार्च २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला होता. नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे देणे, प्रशासन सुलभ करणे आणि वाढत्या शहर विस्तारानुसार विभागीय कामकाज सक्षम करणे हा या पुनर्रचनेमागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या नव्या रचनेनुसार ३२ निवडणूक प्रभागांचे विभाजन नव्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये करण्यात आले असून, हा निर्णय २५ मे २०२६ पासून लागू होणार आहे.
यामध्ये ‘राजगड’, ‘सिंहगड’, ‘शिवनेरी’, ‘प्रतापगड’, ‘रायगड’, ‘लोहगड’ अशा ऐतिहासिक किल्ल्यांची नावे क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली आहेत. त्यामुळे शहराच्या प्रशासनिक व्यवस्थेत मराठी अस्मिता आणि इतिहासाचा ठसा उमटल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी मांडला होता. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या प्रस्तावाला यश मिळाले असून, नव्या प्रशासनिक रचनेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
हेही वाचा
साखर निर्यातीवर सप्टेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नव्या क्षेत्रीय कार्यालयांची नावे आणि प्रभाग
- अ क्षेत्रीय कार्यालय – ‘राजगड’ (निगडी)
- ब क्षेत्रीय कार्यालय – ‘सिंहगड’ (चिंचवडगाव)
- क क्षेत्रीय कार्यालय – ‘विजयदुर्ग’ (भोसरी)
- ड क्षेत्रीय कार्यालय – ‘देवगिरी’ (रहाटणी)
- ई क्षेत्रीय कार्यालय – ‘शिवनेरी’ (भोसरी)
- फ क्षेत्रीय कार्यालय – ‘तोरणा’ (निगडी)
- ग क्षेत्रीय कार्यालय – ‘पुरंदर’ (थेरगाव)
- ह क्षेत्रीय कार्यालय – ‘प्रतापगड’ (कासारवाडी)
- ज क्षेत्रीय कार्यालय – ‘रायगड’ (ताथवडे)
- ल क्षेत्रीय कार्यालय – ‘लोहगड’ (पिंपरी)
शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक विकेंद्रित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच गड-किल्ल्यांच्या नावांमुळे नागरिकांमध्ये स्थानिक अभिमान आणि ऐतिहासिक जाणीव वाढण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
“पिंपरी-चिंचवड शहराचा इतिहास, संस्कृती आणि मराठी अस्मिता जपण्याच्या उद्देशाने क्षेत्रीय कार्यालयांना गड-किल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. प्रशासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद देत हा निर्णय घेतल्याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा देणाऱ्या या गड-किल्ल्यांची नावे आता महापालिकेच्या प्रशासनातही कायम स्मरणात राहतील. नागरिकांमध्येही यामुळे ऐतिहासिक अभिमानाची भावना अधिक दृढ होईल.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा.





