पवना धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ
खासदार श्रीरंग बारणे यांचा पुढाकार, सलग दहाव्यावर्षी काढला जातोय गाळ

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या उद्देशाने धरणातून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सलग दहाव्या वर्षी धरणातून गाळ काढण्यात येत असून, त्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला आहे. शासनाचा कोणताही निधी न घेता लोकसहभागातून गाळ काढला जात आहे. गाळ काढल्याने धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली असून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत नाही.
पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी विधिवत पूजन करून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. खासदार बारणे यांनी गेल्या १० वर्षांपासून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता लोकसहभागातून हे गाळ काढण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत असून, परिसरातील जलसंधारणाला बळ मिळत आहे. यंदाही पवना धरणातील जास्तीत जास्त गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, सोमनाथ कोंडे, मदनभाऊ शेडगे, युवासेना जिल्हा प्रमुख सागर पाचरणे, उपजिल्हा प्रमुख दत्ताभाऊ केदारी, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, भगवान भिकोले, माजी सरपंच लाला गोंते, माजी उपसरपंच काळूभाऊ उंबरकर, अक्षय उंबरकर, भगवान दरेकर, बाळासाहेब दरेकर, एकनाथ दरेकर, अमित मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :
पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी फेडरेशन ‘कटिबद्ध’!
गेल्या ५० वर्षांपासून पवना धरणातील गाळ काढला जात नव्हता. त्यामुळे पाणी साठण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांपासून धरणातील गाळ काढण्यास सुरुवात केली. परिणामी, धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ लागले नाही. उन्हाळ्यात देखील पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ काढण्याचे काम चालू राहणार आहे.
खासदार बारणे म्हणाले, पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा होतो. या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला जातो. त्यामुळे पाणीसाठ्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येते. धरणातून गाळ काढण्याला सुरुवात करण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहराला दोन दिवसाआड पाणी मिळत होते. पाण्याची मोठी टंचाई जाणवत होती. त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात धरणातील गाळ काढण्यात येत आहे. आत्तापर्यंत ८५ हजार क्युबिक मीटर गाळ धरणातून काढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही तीव्र पाणीटंचाई जाणवत नाही.
गाळातून गुलाब शेतीही फुलली
पवना धरणातील काढलेला गाळ मावळातील शेतकऱ्यांना निशुल्क दिला जातो. मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुलाबाची जगात निर्यात केली जाते. गुलाब शेतकऱ्यांना पोयटा मातीचा फायदा होता. त्यामुळे गुलाबाच्या उत्पन्नात भर पडते. गुलाबाच्या शेतीतही वाढ झाली. पाणीसाठवण क्षमताही वाढली आणि गुलाबाची शेतीही फुलल्याने नागरिकांना दुहेरी फायदा होत आहे. त्यामुळे स्थानिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले आहेत.





