जगभरातील हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंना मदत करावी; सरसंघचालक मोहन भागवत

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातील वाढत्या अराजकतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत तेथील हिंदू समाजाने सुरक्षिततेसाठी एकत्र राहावे, असे आवाहन केले आहे. तसेच जगभरातील हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंना मदत करावी आणि भारत सरकारनेही त्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत, असे ते म्हणाले.
बांगलादेशात दीपू चंद्र दास यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला बांधून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांनी बांगलादेशातील हिंदूंना संघटित राहण्याचे आवाहन केले.
हेही वाचा : राज्यात ‘प्राथमिक’ आणि ‘रुग्णालय’ सेवांसाठी स्वतंत्र आरोग्य संचालक !
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, बांगलादेशात ते (हिंदू) अल्पसंख्याक आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. परंतु, अशा कठीण परिस्थितीत सुरक्षिततेसाठी तिथल्या हिंदूंनी एकजूट राहायला हवे. जगातील हिंदूंनी त्यांना मदत केलीच पाहिजे. आपल्याला करता येण्यासारखे जे काही आहे, ते आपण केले पाहिजे आणि आपण ते करत आहोत. भारत सरकारला बांगलादेशातील हिंदूंसाठी काहीतरी करावे लागेल. कदाचित ते करतही असतील. काही गोष्टी समोर येतात, काही गोष्टी समोर येत नाहीत. कधी परिणाम दिसतात, तर कधी दिसत नाहीत. पण, त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे.
बांगलादेशाची सीमा खुली करायची की नाही याबाबत प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. देशात कोणाला प्रवेश द्यायचा यावर नियंत्रण असले पाहीजे. सीमा हिंदूंसाठी खुली केली आणि दुसरेच येत आहेत, हे घडायला नको, असं मोहन भागवत म्हणाले.





