माणिकराव कोकाटेंची आमदारकी सुरक्षित; सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Manikrao Kokate | गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. १९९५ सालच्या फसवणूक प्रकरणात दोषी ठरवत सत्र न्यायालयाने दिलेल्या २ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे सध्या तरी माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कोकाटेंच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर उच्च न्यायालयात शिक्षेवर स्थगितीसाठी दाद मागण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार देत याचिका फेटाळली होती. त्यानंतर कोकाटेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
हेही वाचा : जगभरातील हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंना मदत करावी; सरसंघचालक मोहन भागवत
मुकुल रोहतगी यांनी सुनावणी सुरू होताच शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी चालू आहे. कोकाटेंची स्थगितीची मागणी न्यायालयाने मान्य केली असून राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान माणिकराव कोकाटेंची आमदारकी काढून घेतली जाणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र, असं असलं तरी यादरम्यान कोकाटेंना कोणतंही मंत्रीपद, महामंडळाचं प्रमुखपद किंवा इतर कोणतंही अधिकारपद भूषवता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.





