केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर करावी; उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबई | मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानभरपाईची रक्कम त्वरित जमा करावी आणि बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, की शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असून कोणतीही शहानिशा न करता शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तत्काळ जमा करावेत. या खात्यांमधऊन बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करू नये. केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्राला १० हजार कोटींची मदत जाहीर करावी.
हेही वाचा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्याने पाहिली नव्हती. काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती, पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिके डोळ्यांदेखत पाण्यात गेली आहेत. जमीन वाहून गेल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहे. गुरेढोरे वाहून गेली, रस्ते वाहून गेलेत. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला होता. तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली. शेती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतेय. पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत आहेत. सरकारमधील एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. मराठवाड्याला सापत्न वागणूक देताय. साधी हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. नुसते मंत्रालयातल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन टीव्ही समोर पाहणी करण्याचे नाटक सुरू आहे. आजची कॅबिनेट रद्द करून पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता, असेही ठाकरे म्हणाले.





